सिडनी ः वृत्तसंस्था
महिला टी-20 मालिकेतील दुसर्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा चार गडी राखून पराभव झाला. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0ने आघाडी घेतली आहे. असे असले तरी भारताची वेगवान गोलंदाज शिखा पांडेने टाकलेल्या चेंडूची जोरदार चर्चा आहे. शिखा पांडेने एलिसा हिली हिचा त्रिफळा उडवला. पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर दुसर्या चेंडूवर एलिसा तंबूचा रस्ता दाखवला. ती अवघ्या 4 या धावसंख्येवर तंबूत परतली. शिखोने ऑफ साइडवरून इनस्विंग टाकताना एलिसा हिली हिचा त्रिफळा उडवला. तिच्या या चेंडूला सोशल मीडियावर ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ आणि ‘बॉल ऑफ द इअर’ संबोधले जात आहे. तिने टाकलेला चेंडू इतका स्विंग झाला की हिलीला आपण विकेट वाचवणे कठीण झाले. वसीम जाफरने ट्विट करत या चेंडूला बॉल ऑफ द इअर संबोधले आहे. महिला क्रिकेटमध्ये हा बॉल ऑफ द सेंच्युरी आहे. काय मस्त गोलंदाजी केली शिखा पांडे, असे ट्विट जाफरने केले आहे.