Breaking News

बांगलादेश ‘सुपर 12’मध्ये

अल अमिरात ः वृत्तसंस्था

स्कॉटलंडकडून सलामीच्या लढतीत पत्करलेल्या बांगलादेशने गुरुवारी पापुआ न्यू गिनी संघावर 84 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची सुपर 12 फेरी गाठली. अष्टपैलू कामगिरी करणारा शाकिब अल हसन बांगलादेशच्या विजयाचा शिल्पकार ठरला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकांत 7 बाद 181 धावांचे आव्हान उभे केले. बांगलादेशच्या डावाची सुरुवात अडखळत झाली. मोहम्मद नइम खाते न खोलता बाद झाला. त्यानंतर दुसर्‍या गड्यासाठी लिटॉन दास आणि शाकिब जोडीने 50 धावांची भागीदारी केली. दास 23 चेंडूंत 29 धावा करून बाद झाला. पाठोपाठ पाच धावा करून मुशफिकर रहिम तंबूत परतला. त्यानंतर शाकिब आणि कर्णधार महमुदुल्ला या जोडीने डाव सावरला. महमुदुल्लाने 28 चेंडूंत 50 धावा केल्या. यात तीन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. शाकिब 46 धावा करून असाद वालाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर अफिफ होसैनने 21 धावा जोडल्या. प्रत्युत्तरात पापुआ न्यू गिनी संघाचा डाव 19.3 षटकांत 97 धावांत कोसळला. बांगलादेशने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना पापुआच्या संघाचे एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होण्याची रांग लागली. सुरुवातीला आलेले सात फलंदाज एकेरी धावांवर बाद झाले. त्यानंतर किप्लीन डोरिगा याने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला इतर खेळाडूंची साथ लाभली नाही. शाकिबने चार षटकांत अवघ्या नऊ धावा देत पापुआ संघाचे चार फलंदाज बाद केले. संक्षिप्त धावफलक – बांगलादेश ः 20 षटकांत 7 बाद 181 (महमुदुल्ला 50, शाकिब अल हसन 46; असद वाला 2/26) विजयी वि. पापुआ न्यू गिनी ः 19.3 षटकांत सर्व बाद 97 (किप्लिन डोरिगा 46*; शाकिब अल हसन 4/9).

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply