विकासाची ओढ असलेला मनुष्य संकटात देखील संधी शोधतो. इतकेच नव्हे तर त्या संधीचे सोने करतो. इच्छाशक्ती मात्र दांडगी हवी. भारताच्या सुदैवाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने अशी दांडगी इच्छाशक्ती असलेले नेतृत्व आपल्याला लाभले आहे. त्यामुळेच इतक्या कमी वेळामध्ये लसीकरणाचा 100 कोटींचा आकडा गाठणार्या भारताचे आता जगभरात कौतुक होत आहे.
नेतृत्वाच्या ठायी निव्वळ इच्छाशक्ती असून भागत नाही, तर त्यासाठी भविष्याचा वेध घेणारी सम्यक दृष्टी आवश्यक असते. वर्तमानात पाय रोवून भविष्याकडे नजर रोखून असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी भारतातील नागरिकांना उद्देशून जो संदेश दिला, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. अवघ्या 277 दिवसांत तब्बल 100 कोटी लसी देण्याचा विक्रम भारताच्या नावावर कोरला गेला. त्याचे श्रेय जितके डॉक्टर, नर्सेस आणि अन्य कोविड योद्ध्यांना आहे, तितकेच पंतप्रधान मोदी यांच्या डोळस नेतृत्वाला देखील आहे. काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी नि:संदिग्ध शब्दांमध्ये ट्वीट करून या कामगिरीचे श्रेय मोदी यांच्या पदरात घातले. अशा प्रकारचा राजकीय उमदेपणा काँग्रेसी नेत्यांमध्ये फारच दुर्मिळ आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात भारताची कामगिरी ही अगतिकतेकडून आश्वासकतेकडे कशी झाली याचा थोडक्यात आढावा घेतला. त्याचबरोबर कोविड योद्ध्यांना देखील जाहीर वंदन केले. 16 जानेवारी 2021 मध्ये लसीकरणास सुरुवात झाली तेव्हा भारताबद्दल जगभरातील तज्ज्ञांमध्ये बर्याच शंका-कुशंका होत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण भारताला जमणार आहे का? लसींचे इतके प्रचंड उत्पादन भारतामध्ये शक्य आहे का? मुख्य म्हणजे तुलनेने अर्धविकसित असलेल्या भारतीय जनतेकडून लसीकरणास प्रतिसाद मिळेल का, असे अनेक नकारात्मक प्रश्न भारताच्या संदर्भात जगभर चर्चिले गेले, परंतु जेमतेम पावणे तीनशे दिवसांमध्ये भारतीय जनतेने हा चमत्कार करून दाखवला! पंंतप्रधान मोदी यांच्या संदेशामध्ये आत्मविश्वास होता आणि एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा देखील होती. अर्थात शंभर कोटी लसीकरण झाल्यानंतर बेसावध राहण्याचे कारण नाही, असेही मोदी यांनी बजावून सांगितले. कवचकुंडले कितीही भक्कम असली तरी युद्ध पूर्ण संपेपर्यंत शस्त्रे खाली ठेवायची नसतात अशा प्रभावी शब्दांमध्ये त्यांनी योग्य तो संदेश जनतेच्या मनामनात पोहोचवला. याच संदेशातील आणखी एका मुद्द्याकडे लोकांची डोळेझाक होण्याची शक्यता आहे. तो मुद्दा म्हणजे भारतीय उत्पादनांबाबतचा. यंदाच्या दिवाळीत खरेदी करताना शक्य तो मेड इन इंडिया म्हणजेच भारतात उत्पादित वस्तूंच्या खरेदीवरच भर द्या, असे आवाहन मोदी यांनी केले. भारतातील बाजारपेठ ही जगभरातील उत्पादकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. मोठमोठे आंतरराष्ट्रीय बॅ्रण्ड्स भारतातील मध्यमवर्गावर डोळा ठेवून असतात. त्यातही चिनी उत्पादकांची वक्रदृष्टी मोठ्या प्रमाणावर पडलेली असते. हीच बाजारपेठ भारतीय उत्पादकांसाठी यशाची गुरुकिल्ली ठरेल हे पंतप्रधान मोदी बरोबर जाणून आहेत. म्हणूनच व्होकल फॉर लोकलचा नारा त्यांनी पुन्हा एकदा दिला आहे. कोरोनाचे संकट आता दूर होऊ लागल्याने भारताला पुन्हा एकदा विकासाची स्वप्ने पडू लागली आहेत. ही स्वप्ने साकार व्हावीत यासाठी मेड इन इंडिया हा विकासाचा महामंत्र अंगिकारण्यावाचून तरणोपाय नाही. देशभर विक्रमी लसीकरणाचा उत्सव सुरू आहे. विकासाच्या वाटेवर याहूनही अधिक मोठेे उत्सव साजरे करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे.