Breaking News

स्कॉटलंडचा ओमानवर विजय; सुपर 12 फेरीत प्रवेश

अल अमिरात ः वृत्तसंस्था

टी-20 वर्ल्डकपच्या पात्रता फेरीच्या सामन्यात स्कॉटलंडने ओमानवर आठ गडी राखून विजय मिळवला आहे. ओमान संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत सर्वबाद 122 धावा करू शकला. हे आव्हान स्कॉटलंडने 17 षटकांत दोन गडी गमवून पूर्ण केले. या विजयासह स्कॉटलंडने सुपर 12 फेरीत प्रवेश केला आहे. ओमानने दिलेल्या 123 धावांचा पाठलाग करताना स्कॉटलंडकडून सलामीला आलेल्या जॉर्ज मुनसे आणि काइल कोएत्झर या जोडीने सावध सुरुवात करून दिली, मात्र फायाज बटच्या गोलंदाजीवर उंच फटका मारण्याच्या नादात जॉर्ज 20 धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर कर्णधार काइल कोएत्झर 41 धावा करून बाद झाला. तिथपर्यंत संघावरील दडपण बर्‍यापैकी दूर झाले होते. तिसर्‍या गड्यासाठी मॅथ्यू क्रॉस आणि रिची बेरिंगटॉन यांनी विजयी भागीदारी केली.तत्पूर्वी, ओमानला सुरुवातीला जतिंदर सिंगच्या रूपाने पहिला धक्का बसला. मार्क वाटने त्याला धावचीत केले. त्यानंतर लगेचच कश्यप हरिशभाई बाद झाला. त्यामुळे अडचणीत आलेल्या संघाला अकिब ल्ल्यास आणि मोहम्मद नदीम जोडीने सावरले. त्यानंतर झीशान मकसूदने 34 धावा करत त्यात भर घातली, मात्र या तीन खेळाडूंव्यतिरिक्त एकही खेळाडू मैदानात तग धरू शकला नाही. संदीप गौड (5), नसीम खुशी (2), सुरज कुमार (4), फयाज बट (7), बिलाल खान (1) अशा धावा करीत तंबूत परतले. स्कॉटलंडकडून जोश डॅवेने सर्वाधिक तीन गडी बाद केले.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply