Breaking News

चला मतदार यादीत नाव नोंदवू…

मतदार नोंदणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2022 या दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 1 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. त्या मोहिमेविषयी माहिती…

भारत जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लोकशाहीच्या माध्यमातून जनतेच्या आशा-आकांक्षाची पूर्तता करण्याचे अनेक स्तरावर प्रयत्न करण्यात आले. जनतेचे राज्य ही संकल्पना स्वीकारून जनतेने निवडून दिलेल्या जनप्रतिनिधींच्या माध्यमातून राज्य चालविले जात आहे. जनतेने निवडलेले प्रतिनिधी सक्षम व योग्य असावे यासाठी मतदारांनी जागृत व निर्भयपणे मतदान करणे आवश्यक आहे.

भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. भारतासारख्या लोकशाही देशात प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क आहे. जिथे प्रत्येक प्रौढ नागरिक आपल्या मताचा वापर करण्यास स्वतंत्र असतो. सरकार बनविण्यात देशातील प्रत्येक मतदारांची महत्त्वाची भूमिका असते. सरकार स्थापन करण्यासाठी प्रत्येक मत अमूल्य आहे. एक-एक मताने सरकार बनते आणि बिघडते. म्हणून, प्रत्येकाने निःपक्षपातीपणे मतदान केले पाहिजे आणि राष्ट्रनिर्मितीत त्यांचा सहभाग निश्चित केला पाहिजे.

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित

निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेचा कणा आहे. विशेषत: निवडणुकांमध्ये स्थानिक स्तरावरील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून योग्य प्रतिनिधी निवडणे आवश्यक आहे. या निवडीवरच विकासाचे नियोजन आणि सामाजिक विकास अवलंबून असते. म्हणून मुक्त आणि निर्भय वातावरणात मतदारांनी मतदान करायला हवे. वयाच्या 18 व्या वर्षानंतर, भारतातील प्रत्येक नागरिकाने त्यांना मतदान करण्यासाठी मतदार यादीमध्ये त्यांचे नाव तपासावे आणि सरकारकडून वैध ओळखपत्र घेणे ही वैयक्तिक जबाबदारी आहे. मतदानाच्या वेळी मतदार यादीत नावे नसल्याने मतदानाचा अधिकार न बजावता आल्याचेही बर्‍याचदा निदर्शनास येते. हे टाळण्यासाठी निवडणूक आयोगाकडून अनेक उपाययोजना राबविण्यात येत असतात. मतदार जागृती, मतदार नोंदणी अभियान, स्विप कार्यक्रम तसेच मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम असे अनेक उपक्रम राबवून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

येत्या काळात राज्यात अनेक महानगरपालिका, नगरपंचायत/नगर परिषदा व ग्रामपंचायत यांच्या निवडणुका होणार आहे. त्याअनुषंगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे.

मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम

महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये मतदान वाढावे, यासाठी यंदा दि. 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत जास्तीत जास्त नवमतदार नोंदणी करण्यासाठी जनजागृती येत आहे. या कालावधीत मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यानुसार, 1 नोव्हेंबर रोजी एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत मतदार यादीवरील हरकती व दावे स्विकारण्यात येणार आहेत. हे दावे व हरकती 20 डिसेंबर 2021 पर्यंत निकाली काढण्यात येणार आहेत.

निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दि. 13, 14, 27 आणि 28 नोव्हेंबर 2021 या दिवशी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम आयोजित करण्यात येत आहे. या दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपल्या नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर हजर राहून पात्र व्यक्तींचे मतदान नोंदणीसाठी अर्ज स्विकारतील. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीमधील नावातील दुरुस्त्या, बदल, तृतीय पंथीयांसाठी लिंग बदलाबाबतची सुविधा, छायाचित्रे अद्ययावत करणे, गरजेनुसार नवीन मतदान केंद्र तयार करणे आदींचा समावेश करण्यात येत आहे. मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करून अद्ययावत मतदार यादी तयार करण्यात येत आहे. जर यावर कुणाला आक्षेप असल्यास त्याची शहानिशा करून दिनांक 5 जानेवारी 2022 रोजी अंतिम मतदार यादी तयार करण्यात येणार आहे.

नवमतदार नोंदणीसाठी निवडणूक साक्षरता मंच महत्त्वाचा

भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखा जातो, मात्र मतदार यादीत अद्यापही अनेक तरुणांच्या नावाचा समावेश नाही. तसेच अनेकांची छायाचित्रे मतदार यादीत नाही. देशाच्या विकासासाठी व राजकीय प्रगल्भतेसाठी तरुणांनी जास्तीत जास्त मतदान करायला हवे. मतदार यादीत नाव समाविष्ट करणे व प्रत्यक्ष मतदानासाठी जास्तीत जास्त तरुणांनी येऊन विचारपूर्वक मतदान करणे आवश्यक आहे. मात्र, 19 ते 30 वय असलेल्या युवकांचे लोकसंख्येमध्ये प्रमाण 13 टक्के आहे, मात्र मतदार नोंदणीत केवळ 13 टक्के युवक आहेत. या युवकांना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्यात त्याविषयी साक्षरता निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाने हाती घेतले आहे. या अंतर्गत प्रत्येक महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंडळ, विविध स्पर्धा, प्रश्नोत्तरे, लोकशाही गप्पा, मतदार नोंदणी कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण या विभागाने शासन निर्णय निर्गमित करून प्रत्येक विद्यापीठांमध्ये ‘निवडणूक साक्षरता मंच’ स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. या दृष्टीने महाविद्यालय स्तरावर ‘निवडणूक साक्षरता मंच’ स्थापन करून ती लोकशाही सक्षमीकरणाची व्यासपीठे व्हायला हवी. ‘लोकशाही क्लब’मार्फत प्रत्येक विद्यापीठे, महाविद्यालये, विद्यालयाने नवमतदारांची नोंदणी होण्यासाठी प्रत्येकाने सहभाग घ्यायला हवा. क्लबच्या मंचावर राजकीय नेते, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी यांना निमंत्रित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. मतदानाकरिता वापरण्यात येणार्‍या ईव्हीएम मशीनची अद्ययावत माहिती विद्यार्थ्यांना करून द्यावी जेणेकरून हा मंच आणखी सक्षम करता येईल, अशा सूचना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत.

विशेष ग्रामसभेचे आयोजन भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला असून ग्रामीण भागात मतदार जागृतीसाठी नोव्हेंबर महिन्यात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागामार्फत देण्यात येणार आहेत.

जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांमार्फत ग्रामसभेचे नियोजन करण्यात येणार आहे. नवमतदार आणि गावात नुकतेच विवाह होऊन आलेल्या महिलांची शिबिराच्या माध्यमातून मतदार यादीत नोंदणी करण्यात येणार आहे. मतदार यादीत दिव्यांग मतदारांची नोंद घेण्यात यावी.

असे करा नाव समाविष्ट

मतदारयादीत नाव नसलेले, छायाचित्र नसलेले तसेच नवमतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी या कालावधीत संधी मिळणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या या संकेतस्थळावरही नोंदणी होऊन मतदार यादीत नाव समाविष्ट होऊ शकेल. भारत निवडणूक आयोगाच्या या संकेतस्थळावरही नोंदणीसंदर्भात सविस्तर माहिती मिळू शकते. तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेतही वेळोवेळी नोंदणीसाठी राबविण्यात येणार्‍या विविध अभियानांची माहिती मिळू शकते. यानुसार नागरिकांना राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलवर (हीींिीं://ुुु.र्पीीिं.ळप/) मतदार यादीत नाव नोंदणी, दुरुस्ती करता येणार आहे. मतदारांनी नाव मतदार यादीत आहे की नाही हे हीींिीं://शश्रशलीेींरश्रीशरीलह.ळप/ या संकेतस्थळावर भेट देऊन पाहू शकता. मतदार यादीत नाव नसलेले अथवा नव मतदारांनी नाव यादीत समाविष्ट करण्यासाठी हीींिीं:/र्/ीेींंशीिेीींरश्र.शलळ.र्सेीं.ळप/ या संकेतस्थळावर भेट द्यावी. त्याचप्रमाणे मतदार सहाय्यक मोबाइल अ‍ॅपद्वारेही (तेींशी कशश्रश्रिळपश अिि) नाव शोधू अथवा समाविष्ट करू शकता.

-नंदकुमार ब. वाघमारे, सहाय्यक संचालक (माहिती), कोकण विभागीय माहिती कार्यालय, नवी मुंबई

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply