जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांची स्पष्टोक्ती
पनवेल : विशेष प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर हे राष्ट्रवादीत जाणार असल्याचे वृत्त निराधार आणि हास्यास्पद असल्याची टीका भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांनी केली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर एका स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीवर भाष्य करताना देशमुख यांनी हे सारे कपोलकल्पित असल्याचे सुचित केले आहे. या प्रकारच्या वावड्या उठवून अफवा पसरविल्या जात आहेत. यामध्ये कोणत्याही स्वरूपाचे तथ्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आमदार प्रशांत ठाकूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,नामदार नितीन गडकरी आणि प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या गळ्यातील ताईत आहेत. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे ते रायगडभर भाजप वाढीसाठी कसून प्रयत्न करीत आहेत, असेही देशमुख यांनी सांगितले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी अत्यंत चांगले संबंध आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या कामानिमित्त त्यांचे वरचेवर बोलणे होत असते, रयत शिक्षण संस्थेच्या ज्येष्ठ पदाधिकार्यांमध्येही लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा समावेश आहे.तसेच ते मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य आहेत.रयतचे चेअरमर डॉ. अनिल पाटील,व्हाईस चेअरमन अॅड.भगिरथ शिंदे यांच्या संचालक मंडळाच्या कार्यकारिणी समितीतही त्यांचा समावेश आहे. त्यामुळे रयतच्या निर्णय प्रक्रियेतही लोकनेते रामशेठ ठाकूर यांना मानाचे स्थान आहे.त्याशिवाय वेगवेगळ्या समारंभालाही त्यांना अगत्याने प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात येते.
रयत शिक्षण संस्थेमध्ये विविध पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. समाजकारण आणि राजकारण यात फारकत असल्याने शरद पवार आणि रामशेठ ठाकूर यांच्या भेटींचा संबंध राजकारणाशी जोडणे चुकीचेच आहे, तसेच ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असे म्हणणेही अत्यंत बालिशपणाचे ठरेल, अशी स्पष्टोक्ती वाय. टी. देशमुख यांनी केली आहे.