मुरूड : प्रतिनिधी
स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरण जनजागृतीसाठी मुरूड शहरात गुरुवारी (दि. 28) नगर परिषदेतर्फे पथनाट्ये सादर करण्यात आली. या वेळी सायकल रॅलीही काढण्यात आली होती.
मुरूड नगर परिषदेतर्फे गुरुवारी शहरातील बाजारपेठेत पथनाट्ये सादर करण्यात आली. वायुप्रदुषण आणि आजारी व्यक्तींना त्रास होऊ नये, यासाठी येणार्या दिवाळीमध्ये फटाक्यांचा वापर टाळावा, तसेच भारतीय प्रजातींच्या झाडांची जास्तीत जास्त लागवड करणे, घरातील ओल्या कचर्यापासून कंपोस्टिंग करणे व कचर्याचे संकलन, विलगीकरण व शास्त्रोक्त व्यवस्थापन करणे याविषयी या पथनाट्यांद्वारे जनजागृती करण्यात आली.
इंधन बचत व प्रदूषण टाळण्यासाठी शक्यतो सायकल प्रवास करावा, या विषयी जनजागृती करण्यासाठी मुरूड शहरात सायकल रॅली काढण्यात आली होती. नगर परिषद कार्यालयापासून निघालेल्या या सायकल रॅलीला नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी हिरवा झेंडा दाखविला. ही रॅली बाजारपेठ, एकदरा ब्रिजमार्गे विश्रामबाग येथे आली.
तेथे रॅलीचा समारोप झाला. आरोग्य निरीक्षक राकेश पाटील, मनोज पुलेकर यांच्यासह नगर परिषदेच्या इतर कर्मचार्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.