240 खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पूर्ण
अलिबाग ः प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील झिराड येथील साई क्रीडा मंडळ पुरस्कृत अलिबाग प्रीमियर लीग (एपीएल) क्रिकेट स्पर्धा 2 ते 4 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेसाठी 240 खेळाडूंची लिलाव प्रक्रिया नुकतीच अलिबाग-रेवस मार्गावरील खडताळ पुलाजवळील होरीझोन बँक्वेट हॉलमध्ये पार पडली.
एपीएलच्या लिलाव प्रक्रियेसाठी तालुक्यातून 495 खेळाडूंनी अर्ज भरले होते. पाचशे रुपयांपासून 25 हजार रुपयांपर्यंत लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. यात आर. एम. सप्लायर्ससह 16 संघ मालकांनी सहभाग घेतला. अर्ज केलेल्यांपैकी 240 खेळाडूंचा लिलाव झाला. या वेळी चषकाचेही अनावरण करण्यात आले.
स्पर्धेत प्रवेश घेणार्या संघाला 40 हजार रुपये प्रवेश शुल्क असणार आहे. विद्युत प्रकाशझोतात स्पर्धा होणार आहे. प्रथम क्रमांक पटकाविणार्या संघाला एक लाख रुपये व चषक, द्वितीय 75 हजार रुपये व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकाच्या संघाला प्रत्येकी 50 हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज ठरणार्या खेळाडूंना चषक देऊन सन्मानित केले जाणार आहे.