Breaking News

‘नैना’संदर्भात तातडीने बैठक घ्या

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
नैना प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीसंदर्भात तातडीने बैठक आयोजित करण्याची आग्रही मागणी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी सिडकोकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात शेतकर्‍यांची भूमिका मांडताना म्हटले आहे की, सिडकोमार्फत नैना नियोजन प्राधिकरण हद्दीतील अनेक घरे अथवा बांधकामांना अनधिकृत असल्याबाबत निरनिराळ्या वेळी अनेक नोटीस देण्यात आल्या आहेत. वस्तुतः ही सर्व घरे शेतकर्‍यांनी स्वतःच्या जागेत बांधली असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा म्हणजे शेतकर्‍यांच्या अधिकारावर होणारे अतिक्रमण आहे. या संदर्भात वारंवार सूचना देऊनही प्राधिकरणामार्फत एखाद्या जुलुमशहाप्रमाणे सिडको प्राधिकरणाची वागणूक दिसून येत आहे. सिडकोला जर नैना परिसरात विकास करायचा असेल तर शेतकर्‍यांना कस्पटासमान वागणूक देऊन सिडको सहकार्याची अपेक्षा करू शकत नाही. म्हणूनच यापुढे नैना क्षेत्रात विकासकामासंदर्भात कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी पुढील कार्यवाहीबाबत माहिती देण्यासाठी प्रकल्पातील शेतकर्‍यांच्या प्रतिनिधीसोबत तातडीने एका बैठकीचे आयोजन करावे, अशी मागणी त्यांनी या निवेदनातून केली आहे तसेच शेतकर्‍यांच्या संदर्भात अन्यायकारी भूमिका घेतल्यास सिडको प्रशासनाविरोधात उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी सिडकोला दिला आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply