Breaking News

कुपोषित बालकांच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

कुपोषण ही समस्या देशाला दीर्घकाळापासून भेडसावत आहे. गरिबी आणि अन्य कारणांमुळे लहान वयात मुलांना आणि मातेला योग्य आहार न मिळाल्याने ही समस्या उद्भवत आहे. गरिबीमुळे लाखो मुलांना आणि मातेलाही पोषक आहार मिळत नसल्याने जन्मतः कुपोषणाची शिकार ठरणार्‍या बालकांचे प्रमाण मोठे आहे. याबाबतीत नुकतीच माहितीच्या अधिकाराखाली सरकारने दिलेल्या आकडेवारीवरून ही परिस्थिती गंभीर असल्याचे समोर आले आहे. त्याहूनही गंभीर म्हणजे सर्वाधिक कुपोषित बालकांची संख्या महाराष्ट्रात आहे.

या विषयी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, माहिती अधिकाराखाली विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात महिला आणि बालविकास कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 33 लाखांहून अधिक कुपोषित बालके असून, त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक मुले अतिकुपोषित आहेत. महाराष्ट्र, बिहार आणि गुजरात या तीन राज्यांमध्ये कुपोषित बालकांची संख्या सर्वाधिक असून, यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. 2011 मधील जनगणनेनुसार देशात एकूण 46 कोटीपेक्षा अधिक मुले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अतिकुपोषित बालकांच्या संख्येत तब्बल 91 टक्के वाढ दिसून आली आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये ही संख्या 9 लाख 27 हजार होती, ती ऑक्टोबर 2021 पर्यंत 17 लाख 76 हजार झाली आहे.

महाराष्ट्रात कुपोषित बालकांची संख्या 6 लाख 16 हजार इतकी असून देशात कुपोषित मुलांच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. यापैकी अतिकुपोषित बालकांची संख्या तब्बल 4 लाख 58 हजार आहे, तर 1 लाख 57 हजार बालके मध्यम कुपोषित आहेत. या यादीत बिहार दुसर्‍या स्थानावर असून, तिथं एकूण 4 लाख 75 हजार बालके कुपोषित आहेत, त्यामध्ये अतिकुपोषित बालकांची संख्या 1 लाख 52 हजार आहे, तर 3 लाख 24 हजार बालके मध्यम कुपोषित आहेत. तिसर्‍या स्थानावर असलेल्या गुजरातमध्ये एकंदर 3 लाख 20 हजार बालके कुपोषित असून त्यापैकी 1 लाख 65 हजार बालके अतिकुपोषित; तर 1 लाख 55 हजार बालके कुपोषित आहेत.

ही समस्या दूर करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे अपोलो हॉस्पिटलचे वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ अनुपम सिब्बल यांनी म्हटले आहे.

कुपोषणामुळे कोणत्याही आजाराचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे बालकांमधील कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी गर्भारपणापासून उपाययोजना करणे आवश्यक आहे. स्तनपान करणार्‍या मातांनादेखील पोषक आहार मिळणे आवश्यक आहे.

यासाठी सहा महिन्यांच्या मुलांना व्यवस्थित स्तनपान मिळेल आणि वयाच्या 5 व्या वर्षापर्यंत त्यांना संतुलित पोषक आहार मिळेल याची सोय करणे महत्त्वाचे आहे, असेही डॉ. सिब्बल यांनी सांगितले.

देशातील कुपोषित मुलांच्या वाढत्या संख्येमुळे ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताचे स्थान आणखी खाली गेले आहे. 2020 मध्ये भारत 94 व्या स्थानावर होता तो आता 101 व्या स्थानावर आला आहे. या समस्येवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने 2018 मध्ये कमी वजन, अ‍ॅनिमिया अशा आजारांनी ग्रस्त असणारी बालके, किशोरावस्थेतील मुले आणि महिलांसाठी पोषण अभियान सुरू केले आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply