कार्यादेश निघाले, डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होणार
कर्जत : प्रतिनिधी
येथील रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनची उंची वाढविण्याचे काम 31 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण केले जाईल, असे मध्य रेल्वे प्रशासनाने कर्जत येथील पंकज ओसवाल यांना लेखी कळविले आहे.
कर्जत रेल्वे स्थानकातील तीन क्रमांकाचा फलाट आणि लोकल किंवा एक्सप्रेस गाडीच्या दरवाजामध्ये मोठे अंतर असल्याने गाडीत चढताना किंवा घाईत गाडी पकडताना प्रवासी पडून जखमी होऊ शकतो, प्रसंगी एखाद्या प्रवाशाला आपला जीव गमवावा लागेल. ही बाब काही प्रवाशांनी सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांच्या निदर्शनास आणून दिली. ओसवाल यांनी या बाबत रेल्वे प्रशासनाकडे 8 एप्रिल 2021 पासून पत्रव्यवहार सुरू केला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या कल्याण व लोणावळा येथील अधिकार्यांनी कर्जत येथे येऊन फलाट क्रमांक तीनची पाहणी केली, त्यावेळी त्यांना समस्येचे गांभीर्य लक्षात आले.
ओसवाल यांनी पुन्हा रेल्वे प्रशासनाकडे कर्जत स्थानकातील फलाट क्रमांक तीनची उंची वाढविण्याचे काम केव्हा सुरू करणार? याबद्दल पुन्हा पाठपुरावा केला असता, रेल्वे प्रशासनाने, सदर कामाचे कार्यादेश काढले असून 31 डिसेंबर 2021 पर्यंत काम पूर्ण केले जाईल असे पंकज ओसवाल यांना कळविले आहे.