Breaking News

माथेरान शिवसेनेच्या 10 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात पक्षप्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त
 थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमधील राजकीय उलथापालथीमुळे येथील वातावरण अचानक तापले आहे. माथेरान नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्यासह 10 नगरसेवकांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत गुरुवारी (दि. 27) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. राज्यात प्रमुख सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. रायगडचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची कार्यपद्धती आणि नेतृत्व भावल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे पक्षप्रवेश करणार्‍या नगरसेवकांनी या वेळी आवर्जून नमूद केले.
माथेरान नगरपालिकेतील शिवसेनेच्या 14 नगरसेवकांपैकी 10 नगरसेवकांनी गुरुवारी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात हा पक्षप्रवेश सोहळा झाला. पक्षप्रवेश सोहळ्यास रायगडचे माजी पालकमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजप तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर आदींसह कर्जत तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
2016मध्ये थेट जनतेमधून निवडून आलेल्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष तसेच 14 नगरसेवक तसेच दोन स्वीकृत नगरसेवक असे एकूण 17 मिळून एकहाती सत्ता आणली होती. सत्तेत असलेले पदाधिकारी आणि शहरप्रमुख यांचे सूत जुळत नसल्याने नगरसेवक आणि शिवसेनेचे पदाधिकारी नाराज होते. खासदार, आमदार यांच्याकडे अनेक बैठका झाल्या, मात्र पक्षातील नाराजी दूर होत नाही आणि त्यात या वर्षाच्या अखेरीस पालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे. ते लक्षात घेता पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे काही नगरसेवकांनी शिवसेनेच्या भगव्या झेंड्याला उतरवत भाजपचे कमळ हाती घेऊन पुढे येणार्‍या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
या पक्षांतरामुळे माथेरान नगरपालिकेत भाजप बहुमतात आले आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये आकाश चौधरी (उपनगराध्यक्ष, आरोग्य समिती सभापती), राकेश चौधरी, सोनम दाभेकर, प्रतिमा घावरे, रूपाली आखाडे, सुषमा जाधव, प्रियांका कदम, ज्योती सोनावळे, संदीप कदम, चंद्रकांत जाधव यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या काही पदाधिकार्‍यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या झालेल्या पराभवानंतर राज्यातील महाविकास आघाडीला भाजपने हा दुसरा धक्का दिला आहे. चंद्रकांत पाटील यांनी यानिमित्ताने महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. ‘झोपेत असतानाच एक दिवस हे सरकार पडेल. सरकारची झोपमोड कधीच झाली आहे,’ असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच भाजपमध्ये प्रत्येकाचा सन्मान केला जातो. गुणवत्तेप्रमाणे संधी दिली जाते. त्यामुळे आता भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माथेरानमधील पदाधिकार्‍यांंनाही योग्य ती संधी दिली जाईल, असे आश्वासनही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या वेळी पक्षप्रवेशकर्त्यांना दिले आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply