Breaking News

पश्चिम महाराष्ट्रातील मेंढपाळ कोकणात दाखल

पाली : प्रतिनिधी

कोरोना काळात दीड वर्षे मेंढपाळांनी आपल्या हद्दीच्या बाहेर पडणे टाळले होते. मात्र आता पाऊस थांबला आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातील मेंढपाळ कोकणात दाखल होऊ लागले आहेत. महामार्ग, ग्रामीण भागातील रस्ते व शेतात ठिकठिकाणी मेंढपाळ आपल्या कळपासह दिसू लागलेत. कोकणात पर्जन्यवृष्टीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मान्सून सुरू होताच कोकणात आलेले मेंढपाळ परतीच्या प्रवासाला लागतात, मात्र पावसाचा जोर कमी होताच साधारणतः दिवाळीनंतर पश्चिम महाराष्ट्रातील मेंढपाळ कोकणातील सह्याद्री पर्वताच्या पट्ट्यात दाखल होताना दिसतात.  पाली खोपोली राज्य महामार्ग, पेण-अलिबाग मार्ग, तसेच मुंबई-गोवा महामार्गावर आता शेळ्या व मेंढ्यांचे कळप दिसू लागले आहेत. कोकणात पूर्वीपासून चालत आलेली शेतात शेळ्या मेंढ्या बसविण्याची, कारवणी पद्धत आजही आपले अस्तित्व टिकवून असल्याचे दिसते. कारवणी पद्धत मेंढपाळांना जगवतेय हेच खरे. पूर्वीच्या काळी रासायनिक खते नसल्याने शेतकरी सेंद्रिय पद्धतीने शेतीची मशागत करीत असत. हिवाळ्यात मेंढपाळ आपल्या शेळ्या-मेंढ्यां घेऊन आल्यावर आपले बिर्‍हाड  एखाद्या शेतात घेऊन बसतात.  या शेळ्यामेंढ्यांचे मूलमूत्र शेतात पडून शेतीची सुपीकता वाढण्यास मदत होते. या पद्धतील कारवणी पद्धत म्हणतात. कारवणी पध्दतीत एका रात्रीसाठी शेळ्या मेंढ्या शेतात बसवल्याने शेतकर्‍याकडून तांदूळ व पैसे बिदागी म्हणून दिली जाते. यातून मेंढपाळ आपला उदरनिर्वाह साधत असतो. शेळ्यामेंढ्यांच्या लेंडीखताला मोठी मागणी असते. फळबागांनादेखील हे खत अधिक उपयुक्त ठरते. शेत जमीन अधिक कसदार होऊन उत्पादनात वाढ व्हावी, याकरिता शेतकरी मेंढपाळांना दरवर्षी स्वतःहून बोलवून घेतात.एका मेंढपाळकडे सुमारे 200 ते 250 मेंढ्या असतात. या मेंढ्या जपणे खूप मोठ्या जबाबदारीचे काम असते. अनेकदा वाढत्या आजारात मेंढ्या दगावतात. महामार्गावरून वेगवान वाहनांच्या धडकेत कळपातील अनेक शेळ्या, मेंढ्या मृत्युमुखी पडत असतात. या कळपात शिकारी कुत्रे, घोडे, कोंबड्या यांचादेखील समावेश असतो. पोटाची खळगी भरण्यासाठी धावणार्‍या या मेंढपाळांचे जीवन हलाखीचे व कष्टप्रद असते, शिवाय या भटकंतीत त्यांच्या लहान लहान चिमुरड्यांना शिक्षण मिळत नसल्याने त्यांचे भवितव्य अंधारमय होते. सरकारने मेंढपाळांना विविध योजनांचा लाभ द्यावा, त्यांच्या मुलांच्या भवितव्यासाठी विशेष तरतूद करावी, अशी मागणी होत आहे.

मेंढपाळांना सतावतेय बिबट्याची भीती

कोकणात आता भरवस्तीत बिबट्याचा धुमाकूळ सुरू झाला आहे. त्यामुळे जनावरांना व नागरिकांना बिबट्याचे भय वाटू लागले आहे. उघड्यावर असणार्‍या शेळ्या-मेंढ्याचा बचाव करण्याचे आवाहन मेंढपाळांसमोर उभे ठाकले आहे. तसेच जंगलातील वनव्यांचादेखील मेंढ्यांच्या कळपाला धोका जाणवत असल्याचे मेंढपालांनी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्रातील मेंढपाळ आता पालीसह रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. शेतीची सुपीकता वाढवण्यासाठी शेळ्या, मेंढ्यांचे मलमूत्र उपयुक्त ठरते, उत्पादनातही मोठी वाढ होते. त्यामुळे आम्ही शेतकरी मेंढपाळांना किमान एक दोन दिवस आमच्या शेतात मुक्काम करण्यास सांगतो. त्याबदल्यात त्यांना तांदूळ अथवा पैसे देतो.

-पांडुरंग तेलंगे, शेतकरी, पाली, ता. सुधागड

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply