Breaking News

भिजलेल्या भातालादेखील हमीभावा द्या

भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अलिबाग : प्रतिनिधी
अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे कोकणात शेतकर्‍यांचा भिजलेला भातदेखील राज्य शासनाने  प्रतिक्विंटल 1850 रुपये इतक्या  हमीभावाने खरेदी करावा, अशी मागणी भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
भाजपचे कोकण प्रभारी व माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे, अशी माहिती भाजपचे अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी शुक्रवारी (दि. 20) पत्रकार परिषदेत दिली. अलिबाग तालुका सरचिटणीस परशुराम म्हात्रे, विधानसभा सरचिटणीस अ‍ॅड. परेश देशमुख, अनंतराव देशमुख, पंचायत समिती सदस्य उदय काठे, जयवंत अंबाजी, आदित्य नाईक या वेळी उपस्थित होते.
कोकणात अंदाजे चार लाख हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड केली जाते. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील पाच जिल्ह्यामंध्ये भातपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. कापणीयोग्य भात भिजल्यामुळे शेतकर्‍याला त्याचा अपेक्षित दर मिळत नाही. कोकणातील पाच लाख शेतकरी बाधीत झाले आहेत. या शेतकर्‍यांचे नुकसान टाळण्यासाठी अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे भिजलेला भातदेखील शासनाने जाहीर केलेल्या प्रतिक्विंटल 1850 रुपये या हमीभावानेच खरेदी करावा, अशी मागणी आमदार रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केल्याचे अ‍ॅड. मोहिते यांनी सांगितले.
रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात एक लाख 40 हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. सरासरी 27 लाख क्विंटल भाताचे उत्पादन होते. यंदा अतिवृष्टी व अवकाळीमुळे भातपिकाचे नुकसान झाले असून, या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. भाजपच्या मागणीमुळे शेतकर्‍यांच्या भाताला हमीभाव मिळेल, असेही अ‍ॅड. मोहिते म्हणाले.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply