नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
बनावट कागदपत्रे तयार करून जुनी वाहने विकली जात असल्याचे तपासात आढळून आले आहे. चोरीच्या कारवर अपघातग्रस्त वाहनांचे चेसीस नंबर व इंजिन नंबर टाकून अशी कागदपत्रे तयार केली जातात. त्यामुळे नागरिकांनी जुनी कार खरेदी करताना फसवणूक होऊ नये यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत नवी मुंबई पोलिसांनी विशेष सूचना केल्या आहेत. जुनी वाहने विकत घेणार्या ग्राहकांनी गाडीचा रंग, मॉडेल नंबर, मॅन्युफॅक्चरिंग वर्ष, इंधन प्रकार रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाच्या वाहन या वेबसाईटवर ऑनलाइन तपासावे. त्यात फरक आढळून आल्यास अधिकृत अधिकारी, डिलरकडून खात्री करुनच वाहन खरेदी करावी. गाडी विकत घेण्यापूर्वी गाडीच्या मूळ मालकाशी संपर्क साधावा. विकत घेणारे वाहन अपघातामध्ये पूर्णपणे नुकसान होऊन मूळ मालकाने इन्शुरन्स कंपनीकडून इन्शुरन्स घेतल्याबाबत खात्री करावी. तसंच विकत घेण्यात येणार्या गाडीचे इंजिन नंबर आणि चेसीस नंबर अपघातातील पूर्णपणे नुकसान झालेल्या वाहनाचा नसल्याची खात्री करावी. त्यात काही तफावत आढळून आल्यास सदर वाहन चोरीचे असल्याचे समजून ते वाहन खरेदी करू नये. तसेच त्याबाबतची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. चोरीच्या वाहनावरील मूळ इंजिन नंबर, चेसीस नंबर छेडछाड करून त्यावर दुसर्या वाहनाचे इंजिन नंबर, चेसीस नंबर प्रिंट केले जात असल्यामुळे ते अनियमित व खरबरीत दिसतात. त्यामुळे सदरचे नंबर अधिकृत अधिकारी, डिलरकडून तपासून घ्यावे, तसेच अशा कारचे सर्व्हिस सेंटरमधून इंजिन नियंत्रण मॉड्युल किंवा इंजिन नियंत्रण युनिट तपासून घ्यावे. त्यानंतर मूळ वाहन मालकाशी संपर्क साधून त्याच्याकडून खात्री झाल्यानंतर सदर वाहनाची खरेदी करावी, अशा सूचना नवी मुंबई पोलिसांनी केल्या आहेत.