हिंदुस्तानी तरुणांनो निर्व्यसनी रहा, राष्ट्र निर्माणाच्या कार्यासाठी सज्ज रहा, असे आवाहन उत्तराखंडमधील 14,500 फुट उंचीच्या पानगरचुला शिखरावरून पनवेल येथील गिर्यारोहक प्रा. विक्रांत घरत यांनी केले आहे.
प्रा. विक्रांत घरत यांनी – 3 ते 10 अंश सेल्सिअस तापमान असणारे पानगरचुला हे शिखर नऊ ऐवजी चार दिवसात सर केले आहे. पिल्लेज व्यवस्थापन महाविद्यालयात प्राध्यापक असलेले विक्रांत घरत पनवेल तालुक्यातील ओवळा गावाचे मूळ रहिवाशी आहेत. त्यांचे वडील ए. सी. घरत हे ओएनजीसी हिमालियन असोशीएशन (ओंचा) मध्ये कार्यरत होते. त्यांनी बरीच पर्वत शिखरे सर केली आहेत. त्यांच्यामुळे निसर्गात, जंगलात जाण्याची आवड निर्माण झाली, असे विक्रांत घरत सांगतात. त्यांनी हिमाचल प्रदेशमध्ये डायरेक्टर ऑफ माऊन्टेंरिंग अलाईड स्पोर्ट्स या संस्थेतून दोन कोर्स केले आहेत. ते पूर्वी हिमालयात वर्षातून एक दोन वेळा जायचे पण कोरोनामुळे या वेळी मोठे आव्हान होते.
गिर्यारोहण करताना अनेक समस्या उद्भवत असतात. समुद्र सपाटीपासून आपण जेव्हा डोंगरावर जातो, तेव्हा सगळ्यात पहिली लागण होते, ती म्हणजे एएमएस (एक्युट माऊंटेन सिकनेस). आपण उंचीवर असतो, तेव्हा आपले डिहायड्रेशन होते, उंच गेल्यावर पाणी प्यायची इच्छा होत नाही. त्यामुळे डिहायड्रेशन झाल्याचे समजत नाही. सुदैवाने आपल्याला ती बाधा झाली नाही, कारण मी रोज चार पाच लीटर पाणी प्यायचो, असे प्रा. घरत सांगतात.
एक मुंबईकर हिमालयात उंच जातो त्यावेळी तेथील गारवा हे आव्हानच असते. पानगरचुला परिससरातील थंडी खूप बोचरी असते. मी पाच कपडे घातले होते. त्यावेळी जमिनीतून गारठा यायचा त्यामुळे रात्री झोप लागत नसे. त्यामुळे रात्रीचा काळ खूप कठीण असायचा. पण तिकडच्या वातावरणात ऊर्जा आहे, त्यामुळे शेवटच्या दिवशी दहा तास चालायला काही कठिण वाटले नाही. मुंबईत दोन तास चाललो तर थकवा येतो पण तेथील वातावरणात जादू आहे.
जोशीमठवरुन प्रवासाची खरी सुरुवात झाली. तेथून 13-14 किमीवर ढाक म्हणून एक गाव आहे. तेथून तीन-चार किमीवर असलेल्या टुगाशीपासून चढायला सुरुवात केली. पहिला गुलीनटॉप तेथून खुलारा मग पानगरचुला तेथून पुन्हा बेस कॅम्प असा चार दिवसांचा प्रवास होता. हा प्रवास एकट्याचा होता, पण स्थानिक गाईड सोबत घेणे गरजेचे असते. गाईड पाणी घ्यायला विसरला. गिर्यारोहणामध्ये पाणी फार महत्वाचे असते. आमच्या जवळ पाणी नाही आणि प्रवास जेमतेम 30 टक्के पूर्ण झालेला आता करायचे काय? शिखरावर शून्य डिग्री तापमान. मग आम्ही बर्फ गोळा करून बाटलीत भरून हलवून त्याचे पाणी करून पित होतो. दुपारी 12.30 वाजता पानगरचुला शिखरावर पोहचलो.
तेथील दृश्य विलक्षणीय आचंबित करणारे होते. समोर द्रोणागिरी पर्वताची रांग पाहून रामायणकालीन इतिहासाची आठवण झाली. भगवान हनुमानाने संजीवनीसाठी लंकेपर्यत पर्वत नेऊन लक्ष्मणाला दिलेली संजीवनी आठवली.
हिमालय म्हणजे पित्यासारखी छत्र छाया आहे. तेथे एक ऊर्जा मिळते. तेथे मला सर्वप्रथम माझ्या वडीलांचे स्मरण झाले, हा ट्रेक मी त्यांना समर्पित करीत असल्याचे प्रा. विक्रांत घरत यांनी सांगितले. शेवटच्या दिवशी सकाळी सहाला परतीचा प्रवास सुरू केला. संध्याकाळी 4.30 वाजता बेस कॅम्पला आलो.
या निमित्ताने मला तरुणांसाठी हा संदेश द्यायचा आहे की, तुम्ही स्वत:ला निरोगी ठेवलेत, व्यसनापासून दूर ठेवलेत तर तुम्हाला तुमच्या जीवनात नवीन पैलू आणि नवीन पडाव पाहता येतील किंवा तुम्ही नवीन बेंचमार्क उभे करू शकता. वर्क लाइक बॅलेन्स असे आमच्या व्यवस्थापन शास्त्रात म्हणतात. वर्क लाइक बॅलेन्स साधूनसुध्दा तुम्हाला निसर्गाच्या कुशीत जाऊन एक जबाबदार नागरिक बनता येईल.
-नितिन देशमुख, पनवेल