आसलवाडीतील बेबी दरवडा यांचा डोलीतून प्रवास
कर्जत : बातमीदार
तालुक्यातील माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी वाड्यांपर्यंत पोहचण्यासाठी रस्ता सुस्थितीत नसल्याने वाहने ये-जा करू शकत नाहीत. त्यामुळे आसलवाडीमधील एका गरोदर महिलेला बुधवारी (दि. 10) डोली करून जुम्मापट्टीपर्यंत न्यावे लागले.
माथेरानच्या पायथ्याशी 12 आदिवासी वाड्या असून त्या वन जमिनीवर वसल्या आहेत. या वाड्यांपर्यंत जाण्यासाठी वन विभाग रस्ता करू देत नाही. त्यामुळे आदिवासी वाड्यांमध्ये राहणार्या लोक दरवर्षी श्रमदान करून कच्चा रस्ता तयार करतात. मात्र तो रस्ता दरवर्षी पावसाळ्यात वाहून जातो. त्यामुळे पावसाळ्यानंतर कोणत्याही प्रकारची वाहने आदिवासी वाड्यांपर्यंत जाऊ शकत नाहीत. यंदाच्या पावसाळ्यात जुम्मापट्टीपासून धनगरवाडा ते आसलवाडी हा रास्ता वाहून गेला आहे. दरम्यान, बेबी गणपत दरवडा (वय 22, रा. आसलवाडी) या महिलेला बाळंतपणासाठी आज बुधवारी सकाळी नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणायचे होते. बेबी दरवडा यांच्या पोटात कळा वाढू लागल्याने स्थानिक ग्रामस्थ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अखेरचा पर्याय म्हणून बुधवारी सकाळी सात वाजता चादरीच्या कपड्याची डोली केली आणि या डोलीतून गणपत दरवडा, काशिनाथ दरवडा, महेश सांबरी, नारायण पारधी, संदीप सांबरी यांनी बेबी दरवडा या गरोदर महिलेला सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील जुम्मापट्टी येथे आणले. त्यानंतर बेबी दरवडा यांना रिक्षातून नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.
आतापर्यंत सात गरोदर महिलांना आणि अन्य वृद्धांना डोली करून माथेरान रस्त्यापर्यंत आणावे लागले आहे. अशा घटना वारंवार होत असल्याने कर्जत तहसील कार्यालय आणि अन्य ठिकाणी रस्त्याच्या मागणीसाठी उपोषणे केली आहेत. मागील महिन्यात याच ग्रामस्थांनी नेरळ-माथेरान घाटरस्ता अडवला होता. मात्र शासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने आम्ही ग्रामस्थ हैराण आहेत.
-जैतू पारधी, आदिवासी कार्यकर्ते