भाजपचे अतुल भातखळकर यांचा टोला
मुंबई : प्रतिनिधी
कोणाचंही नाव न घेता महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा कट उधळून लावला, अशी शेखी मुख्यमंत्र्यांनी मिरवणे म्हणजे शिखंडीच्या मागे लपून टीका करण्यासारखे आहे. अशा शब्दांमध्ये भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या पुन्हा ‘वाफा फ्रॉम होम’ फुकटच्या टीमक्या.. असे देखील भातखळकर यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी केलेले महाराष्ट्राच्या बदनामीचे कारस्थान हे तोडून मोडून आपण उधळून लावले आहे. आपण सगळे कोरोनाशी लढा देत असताना, संकटाशी लढत असताना महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी होय मी हा शब्द मुद्दाम वापरतो आहे, बदनामीचा कट केला होता. महाराष्ट्रात कायदा सुव्यस्था कोलमडली आहे, इथे अमली पदार्थांची शेती होते आहे असे चित्र निर्माण केले. मात्र त्यांचे हे कारस्थान आपण उधळून लावले असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधताना म्हटले होते.
यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून उत्तर दिले आहे, कोणाचेही नाव न घेता महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा कट उधळून लावला, अशी शेखी मुख्यमंत्र्यांनी मिरवणे म्हणजे शिखंडीच्या मागे लपून टीका करण्यासारखे आहे. त्यांनी सरळ सरळ महाराष्ट्रद्वेष्टे कोण आहेत? याची नावे घेतली असती, तर थोडे अधिक बरे झाले असते. परंतु कायद्याचा गैरवापर करून लोकांना आपण तुरूंगात टाकतो आहे. त्यांना मारहाण करतोय हे न ओळखण्या इतकी महाराष्ट्राची जनता दुधखुळी नाही. असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच, आरे कॉलनीतील कारशेडचा निर्णय योग्य वेळेला जनतेला सांगू, मग योग्य वेळ कधी येणार? तुमच्याच सरकारने नेमलेल्या सवलत समितीने आरेमध्येच कारशेड करा हे सांगितले, यावर तुमचे उत्तर काय? या समितीची रिपोर्ट तुम्ही जनतेसाठी खुला का करत नाहीत? एसटी कर्मचार्यांचा पगार कधी देणार? शेतकर्यांना मदत कधी पोहचणार? मंदिरे कधी उघडणार? या लोकांच्या जीवनमरणाच्या प्रश्नांची उत्तर न देता, त्याचे लक्ष अन्य गोष्टींकडे वळण्याकरता महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा कट उधळला असा बागुलबुवा मुख्यमंत्री निर्माण करत आहेत. असा आरोप देखील भातखळकर यांनी या वेळी केला.