नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
पाण्याबाबत स्वयंपूर्ण व 24 तास पाणीपुरवठा असा लौकिक असलेल्या नवी मुंबईच्या काही भागांत गेल्या काही दिवसांपासून पाणी तुटवडा भासत आहे. महापालिकेच्या वितरण व्यवस्थेतील नियोजनाअभावी हे पाणी संकट निर्माण झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
नवी मुंबईला मोरबे धरणातून प्रतिदिन 450 तर एमआयडीसीकडून 80 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. शहराची लोकसंख्या 11.15 लाख आहे तर तरंगती लोकसंख्या पकडून ती आंदाजे 17.60 लाखांपर्यंत जाऊ शकते. शासनाच्या मानकाप्रमाणे प्रतिमाणसी 200 लिटर पाणी देणे बंधनकारक धरले तरी गरजेपेक्षा अधिकचा पाणीपुरवठा दररोज शहराला होत आहे. मात्र पाणी वितरणातील त्रुटींमुळे शहरातील परिमंडळ 2 मधील दिघा, घणसोली, गोठवली राबाडा, ऐरोलीसह तुर्भे झोपडपट्टी भागाला वारंवार पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
याबाबत पालिकेकडून नेहमी एमआयडीसीकडे बोट दाखवले जात आहे, मात्र मोरबे धरणातून दररोज 450 दशलक्ष लीटर पाणी उपसले जात आहे. तीस लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा होईल एवढी क्षमता धरणाची आहे. तरीही शहरात पाणीटंचाई का? असा प्रश्न विचारला जात आहे. महापालिका क्षेत्रात होणार्या पाण्याच्या गैरवापराकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून काही भागांमध्ये मात्र अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने पाणी वितरणाबाबत कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे. बेलापूरपासून दिघ्यापर्यंत सर्वानाच आवश्यक तेवढा पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे.
नवी मुंबई जलसंपन्न शहर आहे. पाणीपुरवठा व्यवस्थेबाबत तज्ज्ञांची समिती बनवून भविष्यकालीन पाणीपुरवठ्याबरोबरच वितरणाबाबत पालिकेने निश्चित धोरण आखले पाहिजे.
वितरणाअभावी पाणी तुटवडा करण्याची आवश्यकता आहे. बेलापूरपासून दिघ्यापर्यंत सर्वांनाच आवश्यक तेवढा पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. नवी मुंबई जलसंपन्न शहर आहे. पाणीपुरवठा व्यवस्थेबाबत तज्ज्ञांची समिती बनवून भविष्यकालीन पाणीपुरवठ्याबरोबरच वितरणाबाबत पालिकेने निश्चित धोरण आखले पाहिजे. पाण्याचा अपव्यय होणार नाही याबाबतही काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे माजी शहर अभियंता मोहन डगावकर यांनी सांगितले. तर माजी आमदार संदीप नाईक यांनी ज्या उपनगरात जास्त पाणी वापर होत आहे ते नियंत्रित करणे गरजेचे आहे. एमआयडीसीकडून 80 एमएलडी पाणी मिळालेच पाहीजे. पालिकेने योग्य नियोजन करून आपल्या हक्काचे पाणी दुसरीकडे जाणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे असे सांगितले.
2050पर्यंत पाणी नियोजनाचा आराखडा करण्यात येत आहे. पाणीपुरवठा वितरणाबाबत हायड्रॉलिक मॉडेलिंग प्रणाली राबवण्यात येत आहे. त्यामुळे शहरात पाणी वितरण व पुरवठ्याबाबत सुयोग्य नियोजन करण्यात येत आहे. दुसरीकडे पाणी गैरवापराबाबतही विभाग स्तरावर कारवाई करण्यात येत आहे.
-संजय देसाई, शहर अभियंता, महापालिका, नवी मुंबई