Breaking News

तळोजा सीईटीपीचे नूतनीकरण पूर्ण

प्रकल्प कार्यान्वित; जलप्रदूषण आवाक्यात आल्याचा दावा

पनवेल : वार्ताहर

राज्यात सर्वाधिक प्रदूषित म्हणून ओळखल्या जाणार्‍या तळोजा एमआयडीसीच्या सीईटीपीचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे. 31 डिसेंबरपासून तळोजा एमआयडीसीतील जलप्रदूषण धोकादायक पातळीच्या बाहेर आल्याचा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने केला आहे. औद्योगिक वसाहतीतून बाहेर पडणारे पाणी प्रक्रिया केल्याशिवाय बाहेर सोडता येत नाही. विविध कारखान्यांमधून येणारे पाणी प्रक्रिया करण्यासाठी प्रत्येक एमआयडीसीत सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्र असते. मोठ्या प्रमाणात रसायनांचे कारखाने असलेल्या तळोजा एमआयडीसीत अनेक वर्षांपासून सीईटीपीची यंत्रणा कार्यान्वित नव्हती. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा जुनी झाल्यामुळे प्रक्रिया न करताच थेट खाडीत पाणी सोडले जात होते. एमआयडीसीच्या माध्यमातून सीईटीपी यंत्रणा उभी करण्यासाठी 70 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय राज्याच्या पर्यावरण विभागाने घेतला होता. सीईटीपीचे नूतनीकरण करण्यासाठी सीईटीपी सोसायटीऐवजी थेट एमआयडीसीवर जबाबदारी देण्यात आली होती. सध्या अस्तित्वात असलेल्या सीईटीपीत नवी यंत्रणा उभी करून नूतनीकरण करणे आणि पाच एमएलडी क्षमतेचा नवा प्रकल्प उभारण्यासाठी के. डी. पाटील कन्स्ट्रक्शन आणि अँक्वाकेम इंजिनियर प्रा. लिमिटेड या कंपन्यांना हा ठेका देण्यात आला होता. नोव्हेंबर 2018पासून सुरू झालेले काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन 31 डिसेंबर 2019पासून सीईटीपीचा प्रकल्प कार्यान्वित झाला. सीईटीपीच्या 10 एमएलडी आणि 12.5 एमएलडी या जुन्या प्रकल्पात जर्मनीहून आयात केलेले टर्बो ब्लोअर, अमेरिकन बनावटीचे डिफ्युजन बसविण्यात आलेत. याशिवाय दोन्ही प्रकल्पांत प्रायमरी आणि सेकंडरी क्लालिफायर बसविण्यात आले. पाण्यातील स्लज अर्थात गाळ काढण्यासाठी नवी यंत्रणा उभारण्यात आली आहे. जुने दोन्ही फेज मिळून साडेबारा क्षमतेचे सीईटीपी प्रकल्पाचे पूर्णपणे नूतनीकरण झाल्यामुळे तळोजातील जलप्रदूषण कमी झाल्याचा दावा ठेकेदार कंपनी, एमआयडीसीने केला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळानेदेखील याला दुजोरा दिला आहे.

महिनाभरात दुसरा टप्पा होणार पूर्ण

जुना प्रकल्प नूतनीकरण करण्यासोबत दुसरा टप्पा म्हणून पाच एमएलडीचा नवा प्रकल्प उभा करण्याचे प्रयोजन होते. त्याप्रमाणे दिलेल्या मुदतीत 13 महिन्यांमध्ये पाच एमएलडी क्षमता असलेला सांडपाणी प्रक्रिया केंद्राचा प्रकल्प उभा केला आहे. या प्रकल्पासाठी नवी वीजयंत्रणा उभी करावी लागणार आहे. ट्रान्सफॉर्मर लागला की लवकरच हा प्रकल्पदेखील कार्यान्वित होईल. त्यामुळे सीईटीपीचा एकूण प्रकल्प 27.5 इतक्या क्षमतेचा होणार आहे.

प्रदूषण होऊ नये यासाठी पाण्यातील सीओडी आणि बीओडीचे प्रमाण आटोक्यात आल्यामुळे तळोजा एमआयडीसीतील जलप्रदूषण कमी झाले आहे. मंडळाने काही दिवसांपूर्वी केलेल्या मोजणीत हे दिसून आले आहे. हा अहवाल सर्वांना पाहण्यासाठी मंडळाच्या वेबसाईटवर आहे.

-अनंत हर्षवर्धन, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नवी मुंबई

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply