सरकारी आणि खाजगी भागीदारीतून देशासमोरील समस्या सोडविणे, हे आधुनिक तंत्रज्ञानामुळे शक्य होताना दिसते आहे. गेल्या 18 नोव्हेंबरला झालेल्या ‘गुगल फॉर इंडिया’च्या सातव्या वार्षिक परिषदेनेही भागीदारी किती व्यापक असू शकते, याची प्रचिती दिली. गुगलसारख्या कंपन्या या मार्गाने भारतातील आपला व्यवसाय वाढविणार आहेत हे तर उघडच आहे, पण हा प्रवाह आता टाळता न येणारा असल्याने त्याचा थेट फायदा घेणे तसेच गुंतवणुकीचे नवे मार्ग वापरून त्याचे भागीदार होणे हे तर आपण केलेच पाहिजे.
आज देशासमोर जे प्रश्न किंवा समस्या आहेत ते सोडविण्याची जबाबदारी कोणाची आहे याचे लोकप्रिय उत्तर ‘सरकार’ असे आहे, मात्र एकटे सरकार सर्व प्रश्न सोडवू शकत नाही हे सर्वांनाच माहीत असते. प्रश्न सोडविण्यासाठी जे नागरिक, खाजगी उद्योग आणि सामाजिक संस्था पुढे येतात त्यांना योग्य वातावरण निर्माण करणे हे काम सरकारचे असते. याचा अर्थ प्रश्न किंवा समस्या सोडविण्याचा प्रयत्न समाज नेहमीच करत असतो आणि त्यात सर्व घटक आपापल्या परीने सहभागी होत असतात. अलीकडेविकसितझालेल्या तंत्रज्ञानामुळे खाजगी कंपन्यांचा त्यातील वाटा वाढत चालला आहे. या कंपन्या एकीकडे आपला व्यवसाय करत असतात, तर दुसरीकडे आपली प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करत असतात. समस्या सोडविण्याचे हे सरकारी आणि खाजगी प्रयत्न किती बेमालूमपणे मिसळले आहेत, याची प्रचिती 18 नोव्हेंबरला झालेल्या ‘गुगल फॉर इंडिया’च्या आभासी अशा सातव्या वार्षिक परिषदेच्या निमित्ताने आली.
भारतीय बाजारपेठेचे महत्त्व
गुगलसारख्या जागतिक पातळीवरील कंपन्यांच्या दृष्टीने भारतीय बाजारपेठ किती महत्त्वाची आहे हे ‘गुगल फॉर इंडिया’ परिषदेच्या निमित्ताने पुन्हा समोर आले. भारतात वाढत चाललेला इंटरनेटचा वापर, एकूणच भारताची प्रचंड लोकसंख्या आणि त्यात तरुणांचे असलेले अधिक प्रमाण, स्मार्ट फोनचा वाढत चाललेला वापर आणि भारतीय बुद्धीमत्तेच्या आधारे काही जटील प्रश्नावर सापडणारी उत्तरे… (त्याला काहीजण जुगाड म्हणतात.) हे गुगल कंपनीला आकर्षित करते आहे. त्यामुळेच गुगलने भारतात पक्के पाय रोवले आहेत. भारतात नजीकच्या भविष्यकाळात गुगल काय काय करू इच्छिते, याची झलक या परिषदेत पाहायला मिळाली. खाजगी कंपन्या करत असलेल्या कामांचे तुम्ही समर्थक असो की विरोधक असो, तुम्ही या बदलांकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत, इतके हे बदल सर्वव्यापी असणार आहेत.
गुगलच्या मदतीची अपरिहार्यता
ही परिषद झाली त्याच्या दुसर्या दिवशी पुण्यातील एक बातमी अशी होती की, पुण्यातील पीएमटी बस सेवा वापरणे प्रवाशांना सुलभ व्हावे म्हणून महापालिकेने एक अॅप तयार केले होते, पण हा विषय पुढे गेला नाही. या अॅपचा वापर आज तरी होताना दिसत नाही, पण हा प्रयत्न आपल्याला सोडायचा असेल तर गुगलसारख्या कंपनीची मदत घेतली पाहिजे, असे काही जणांना वाटले आणि आता गुगल हे अॅप तयार करण्यासाठी महापालिकेला मदत करणार आहे. याचा साधा अर्थ असा की पुण्यासारख्या महापालिकेतील सिटी बसचा प्रश्न गुगलच्या मदतीने सोडविण्याचा प्रयत्न होणार आहे. अर्थात, याचा अर्थ पुणे महापालिका कमी पडते आहे, असा घेता कामा नये. याचा अर्थ एवढाच आहे की, गुगलने इंटरनेटच्या माध्यमातून असे काही जाळे विणले आहे की, त्याचा वापर करून तुम्ही स्थानिक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू शकता. ओला, उबरचा प्रवास किंवा पत्ता सोधण्यासाठी अलीकडे सर्रास वापरले जाणारे गुगल मॅप हे त्याचे चपखल उदाहरण म्हणता येईल. अशा अनेक प्रश्नांना गुगल हात लावणार आहे, हे या परिषदेत लक्षात आले.
परिषदेत झालेल्या घोषणा
‘गुगल फॉर इंडिया’ या परिषदेत अशा कोणत्या योजनांची घोषणा झाली याची यादी मोठी आहे, पण त्यातील काही निवडक घोषणा काय आहेत ते आपण पाहू. 1. ग्लोबल वॉर्मिंगची समस्या जगाला भेडसावते आहे. भारताला त्याचा मोठाफटका अतिवृष्टीच्या रूपाने यावर्षी बसला आहे. गुगल सरकारच्या हवामान खात्याच्या मदतीने हवामानावर अधिक बारकाईने लक्ष ठेवून त्याच्या सूचना नागरिकांना मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गुगलने त्याची सुरुवात यावर्षी केली असून पूर आणि अतिवृष्टीचा सामना करणार्या दोन कोटी नागरिकांना 11 कोटी मेसेज पाठविले आहेत. 2. उत्तर भारतात प्रदुषणामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे, अशा भागात गुगलने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मदतीने हवेच्या दर्जाविषयी मेसेज पाठविण्यास सुरुवात केली आहे. 3. इंटरनेट प्रसार वेगाने होणार आणि त्यात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत. इंटरनेटच्या वापरासंबंधी कौशल्ये असल्याशिवाय या संधी भारतीय तरुणांना घेता येणार नाहीत. त्यामुळे या क्षेत्रात कौशल्ये विकासाचे काम गुगल करणार आहे. आयटी मॅनेजमेंट, डाटा अनॅलिटिक्स, युएक्स डिझाईन असे कोर्सेसच गुगल सुरू करते आहे. सहा ते आठ हजार रुपये असे शुल्क या कोर्सेसचे असून गुगल करीअर सर्टिफिकेट्स मिळविणार्या एक लाख तरुणांना शिष्यवृत्ती देण्याची तयारी गुगलने केली आहे. 4. कोरोनाच्या काळात ऑनलाइन शिक्षण ही गरज आपल्याला मान्य करावी लागली असून ही पद्धत आता कोणत्या ना कोणत्या रूपाने सुरूच राहणार आहे. गुगल क्लासरूम प्रोग्रामच्या मार्गाने इंटरनेटवर अभ्यासक्रम उपलब्ध केले जाणार आहेत. जो इंटरनेट स्पीड चांगली असताना डाऊनलोड करता येईल आणि कधीही वापरता येईल. 5. सध्या गुगलवरील सर्च फक्त इंग्रजी भाषेत मिळतात, पण आता सुरुवातीला हिंदी आणि नंतर इतर सर्व भारतीय भाषांमध्ये हे सर्च उपलब्ध होतील. शिवाय त्यासाठी कोणतेही शब्द टाईप करण्याची गरज नाही. तो शब्द गुगल असिस्टंट ओपन करून उच्चारला की त्या विशिष्ट भाषेतील माहिती समोर येईल. एवढेच नव्हे तर ती गुगल वाचवूनही दाखवेल. ज्यांना इंग्रजीत शिक्षण घेतलेले नाही, त्यातील अनेक जण इंग्रजी वापरताना अडखळतात त्यांची यामुळे गैरसोय दूर होईल. पुढील वर्षभरात यात मोठी सुधारणा अपेक्षित आहे. 6. गुगल पे चा वापर किती वेगाने वाढतो आहे, हे आपण पाहत आहोत. गेल्या वर्षी त्यावर 15 अब्ज व्यवहार झाले. आता बिल स्प्लीट करण्याची तसेच त्यावर इंग्रजीसोबत ‘हिंग्लीस’ (हिंदी आणि इंग्रजी एकत्रित) भाषा वापरण्याची सोय होणार आहे. 7. गुगल पे वर माय शॉप हे फिचर येणार असून त्यावर त्या विक्रेत्याकडे असलेल्या सर्व वस्तूंची यादी पाहायला मिळणार आहे. 8. कोरोनाविरोधी लस सर्वांनी घेतली पाहिजे, याविषयी आता काही दुमत राहिलेले नाही, पण ज्यांच्याकडे संगणक नाही त्यांची अडचण होऊ नये म्हणून ते स्मार्ट फोनच्या मदतीने आणि आपल्या भाषेत गुगल असिस्टंटला सांगून बुकिंग करू शकतील. 9. मित्र नावाच्या एका कार्यक्रमाच्या माध्यमातून गर्भधारणा झालेल्या महिलांना मदत केली जाणार आहे. ज्यांना तातडीची वैद्यकीय गरज आहे त्यांना ती मिळावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी गुगल आर्टिफिशियल इंटलिजियन्सचा आधार घेणार आहे. यासाठी अरमान या स्वयंसेवी संस्थेला गुगलने सोबत घेतले आहे. 10. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओशी करार करून गुगलने भारतीय गरजा लक्षात घेऊन स्वस्तातील स्मार्ट फोन उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. तो फोन पाच हजार रुपयांच्या आसपास मिळणार आहे. त्यामुळे ज्यांना स्मार्ट फोनच्या किमती परवडत नाहीत त्यांनाही स्मार्ट फोन वापरणे शक्य होणार आहे.
-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com