विष्णुभाई पाटील यांची पत्रकार परिषदेत घोषणा
पाली : प्रतिनिधी
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे, मात्र आगामी पाली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत आहे, शिवसेना पक्षसंघटना मजबूत व बलाढ्य असून पाली नगरपंचायत निवडणूक शिवसेना स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा शिवसेना माजी जिल्हाप्रमुख विष्णुभाई पाटील यांनी पालीत पत्रकार परिषदेत केली. पाली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे 17 पैकी 17 सक्षम उमेदवार निवडणूक लढवतील. हे उमेदवार जनतेने विश्वासाने निवडून द्यावेत. आम्हाला भरभरून आशीर्वाद द्यावा. पालीकर जनतेची स्वप्ने, त्यांच्या मनातील विकास व परिवर्तन आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून घडवून दाखवू, अशी ग्वाही विष्णुभाई पाटील यांनी या वेळी दिली.
पाली नगरपंचायत प्रभाग रचनेची आरक्षण सोडत जाहीर झाली. त्यानंतर आगामी नगरपंचायत निवडणुकांचे पालीत बिगुल वाजले, सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली. अष्टविनायकाचे प्रख्यात धार्मिक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीचा पहिला नगराध्यक्ष विराजमान होण्यासाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जात असून त्यादृष्टीने चुरस होणार आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना विष्णुभाई पाटील पुढे म्हणाले की, विशेषतः पालीकर जनतेला शुद्ध व मुबलक पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वर्षानुवर्षे सतावत आहे. नेहमीच पालीकर जनतेला प्रस्थापित राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींकडून शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या वल्गना केल्या जाताहेत.
पोकळ व फसव्या आश्वासनांनी जनतेची कायम दिशाभूल व फसवणूक केली असल्याचेही विष्णुभाई पाटील म्हणाले. पाली नगरपंचायत होऊ नये यासाठी शेतकरी कामगार पक्ष कारणीभूत ठरला आहे. पाली नगरपंचायत होण्यास विलंब झाल्याने विकास रखडला आहे, याला जबाबदार शेकाप असल्याचा आरोप विष्णुभाई पाटील यांनी केला आहे.
या पत्रकार परिषदेला शिवसेना माजी जिल्हाप्रमुख विष्णुभाई पाटील, युवा नेते अनुपम कुलकर्णी, अविनाश शिंदे, संदेश सोनकर, भास्कर दुर्गे आदी उपस्थित होते.