शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने मुंबई नगरीमध्ये लक्षावधी महिला व युवतींना घराबाहेर पडावे लागते. मुंबईतील कामाच्या वेळा अनेकदा गैरसोयीच्या असतात. रात्री उशीरा किंवा वेळी-अवेळी घराबाहेर पडणार्या महिला वर्गाला कोणतेही संरक्षण किंवा किमानपक्षी दिलासा मिळू शकत नाही. हे मुंबईकरांचे कटू वास्तव आहे. अशाप्रकारच्या घटना अचानक वाढीस का लागल्या आहेत?
एखाद्या अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नाचा राजकारणाच्या नादात किती चुथडा होऊ शकतो याचे उदाहरण म्हणून महिला सुरक्षेच्या प्रश्नाकडे बोट दाखवावे लागेल. राजधानी दिल्लीतील निर्भया हत्याकांडानंतर महिला अत्याचारांविषयीचे कायदे अत्यंत कडक करण्याचे धोरण आखण्यात आले. गुन्हेगारांना जरब बसावी म्हणून बलात्कारांची प्रकरणे वेगात निकाली काढून कठोरातील कठोर शिक्षा ठोठावण्याचा इरादा व्यक्त करण्यात आला. महिलांवर होणार्या घरगुती अत्याचारांच्या विरोधातही कडक पावले उचलण्याचे ठरवण्यात आले. कामाच्या ठिकाणी महिलांचे होणारे शोषण थांबावे यासाठी नवी आचारसंहिता तयार करण्यात आली. परंतु निर्भया कांडातील गुन्हेगारांना आठ वर्षांनंतरही अजूनही फासावर चढवता आलेले नाही ही आपल्या व्यवस्थेतील मोठी त्रुटी मानावी लागेल. निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी कधी होणार याची सारा देश प्रतीक्षा करत असताना नागपूरनजीकच्या हिंगणघाट येथे एका तरुण प्राध्यापिकेला दिवसाढवळ्या भयानक प्रसंगाला सामोरे जावे लागले. एकतर्फी प्रेमाच्या दुराग्रहात एका नराधमाने तिच्यावर पेट्रोल ओतून भर चौकात तिला जाळण्याचा प्रयत्न केला. ती दुर्दैवी तरुण प्राध्यापिका नागपूरच्या ऑरेंज सिटी इस्पितळामध्ये अजूनही मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेला 24 तास देखील उलटत नाहीत तोवर सिल्लोड येथे अन्य एका नराधमाने एका विवाहितेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळून टाकले. सिल्लोड येथील दुर्दैवी महिला प्राणास मुकली. लागोपाठ आलेल्या या बातम्यांनी कुठलाही सुजाण नागरिक अस्वस्थ झाल्याशिवाय राहणार नाही. या घटनांची चर्चा समाजमाध्यमे आणि अन्य माध्यमे करत असतानाच मुंबईमधले काही धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. माटुंगा रेल्वे स्थानकाच्या काहिशा निर्मनुष्य पुलावर तरुण मुलींचा विनंयभंग करणार्या एका तरुणाला अटक करण्यात आली. या तरुणाने केलेले असभ्य आणि अश्लील प्रकार सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालेले आहेत. आपल्या व्यवस्थेत काही चुकीचे तर नाही ना, हे पडताळून पाहण्याची जबाबदारी प्रशासनाची आणि राज्यकर्त्यांची असते. परंतु राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातील महिलांची सुरक्षा अक्षरश: वार्यावर सोडून देण्यात आली आहे असे वाटते. महिलांवर अत्याचार करणार्या गुन्हेगारांना तात्काळ अटक करून फटकावून काढा असा आग्रह व निग्रह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला असला तरी कृतीच्या नावाने सारा सावळा गोंधळ आहे हे देखील परखडपणे सांगणे भाग आहे. महिला अत्याचारांमध्ये वाढ कशामुळे झाली? राज्यातील अस्थिर सरकारमुळे कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत का? महिलांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने काय पावले उचलायला हवीत? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रश्नांवर सडेतोड चर्चा व्हावी यासाठी एक दिवसाचे विधिमंडळाचे अधिवेशन बोलवावे अशी मागणी माजी अर्थमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. त्यांच्या मागणीचा विचार करून महिला सुरक्षेचा प्रश्न कायमचा धसास लावावा हीच जनतेची माफक मागणी आहे.
Check Also
मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले
मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …