अलिबाग : प्रतिनिधी
राष्ट्रीय बालरोग संघटना रायगड शाखेच्या वतीने गुरुवारी (दि. 25) पीएनपी नाट्यगृह अलिबाग येथे सांयकाळी 5 वाजता ‘मुले अशी का वागतात’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्यातील नामांकीत डॉक्टर पालकांना मार्गदर्शन करणार आहेत.
कोविड परिस्थिती, बदलती कुटुंब व्यवस्था, समाज माध्यमांचा भडिमार, टोकाची स्पर्धा आणि पालकांच्या मुलांकडून वाढत्या अपेक्षा यामुळे लहान मुलांमध्ये अनेक प्रकारच्या वर्तन समस्या निर्माण होत आहेत. अशा वेळी पालकांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रीय बालरोग संघटनेच्या रायगड शाखेच्या वतीने या विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिसंवादाला जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, नगराध्यक्ष प्रशांत नाईक उपस्थित राहणार आहेत, तर डॉ. जयंत पंढरीकर (अलिबाग), डॉ. निवेदिता पाटील (कोल्हापूर), डॉ. अमोल अन्नदाते (वैजापूर), डॉ. राजीव धामणकर (अलिबाग) आणि डॉ. चंद्रशेखर दाभाडकर (महाड) हे बालरोग तज्ज्ञ उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. हा परिसंवाद सर्वांसाठी खुला असून जास्तीत जास्त पालक आणि शिक्षकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिसंवादाचे संयोजक डॉ. विनायक पाटील, डॉ. राजेंद्र चांदोरकर आणि डॉ. निशिगंध आठवले यांनी केले आहे.