Breaking News

शिक्षणामुळेच आपल्यामध्ये सुधारणा होते -विक्रम देशमुख

कर्जत : प्रतिनिधी

प्रत्येकाने आपला मुलगा किंवा मुलगी असेल त्यांना शिकवले पाहिजे. शिक्षणामुळे आपल्यामध्ये सुधारणा होते, असे मार्गदर्शन कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी केले. उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील आशाणे वाडीमध्ये तहसीलदार विक्रम देशमुख यांनी भेट दिली. या वेळी कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की, सामाजिक कार्यकर्त्या मोनिका बडेकर, उद्योजक निलेश बडेकर उपस्थित होते. वाडीमध्ये बारावी किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेल्या विजय भालचंद्र सांबरी, महेंद्र गणू सांबरी आणि राजेश महादू सांबरी या तीन मुलांचा तहसीलदार विक्रम देशमुख यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या वेळी गावातील एक अपंग मुलगी काजल रामदास पाचअंगे (वय 6) हिला तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दत्तक घेतले आहे. तिच्या उपचाराचा खर्च ते करणार आहेत.

तहसीलदार विक्रम देशमुख यांनी वाड्यातील समस्या जाणून घेतल्या. त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले आदिवासी पाड्यांमध्ये फक्त स्त्री काम करताना दिसते. पुरुष नशा करतात किंवा पत्ते खेळत असतात. मोबाइलवर गाणे ऐकतात किंवा पब्जी खेळत असतात. माझी सगळ्यांना एक विनंती आहे की, मुलांना शिक्षण द्या. प्रत्येकाच्या आयुष्यात बदल होत असेल, तर तो बदल शिक्षणानेच होतो, असे सांगितले. कोणाला एमपीएससी करायचे असेल, कोणाला पोलीसमध्ये भरती व्हायचे असेल किंवा कोणाला सैन्यामध्ये भरती व्हायचे असेल, तर त्यासाठी मी मदत करेन, असे सांगून, व्यसन करू नका, व्यसन सोडून द्या, स्वच्छतेला लागा, मुलांना शिक्षण द्या, मोबाइलचे व्यसन सोडून द्या, असेही त्यांनी शेवटी सांगितले.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply