Breaking News

ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्याला प्राधान्य

अलिबाग : प्रतिनिधी

ताउत्के चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातून होणारा ऑक्सिजनचा पुरवठा बाधित होऊ नये, ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत सुरु रहावा, जिल्ह्यातील रुग्णालयांमधील वीज पुरवठा अखंडित रहावा, याला प्रधान्य देण्यात आले असून, तशा सूचना संबंधीत अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.

रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यात डोलवी, पनवेल तालुक्यात तळोजा आणि माणगाव या ठिकाणी ऑक्सिजन निर्माण करणारे प्रकल्प आहेत. पेण डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीत 224  मेट्रिक टन, तळोजा येथील कंपनीतून 232 मेट्रिक टन तर माणगाव येथील कंपनीतून 180 मेट्रिक टन प्राणवायू दररोज उत्पादित केला जात आहे. याशिवाय अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सहा मेट्रिक टन उत्पादन क्षमतेचा प्राणवायू प्रकल्प उभारण्यात आला आहे. या सर्व प्रकल्पातून दररोज 650 मेट्रीक टन प्राणवायू तयार होत आहे. जिल्ह्याला लागणारा प्राणवायू ठेऊन उर्वरीत प्राणवायू राज्यातील विविध भागात वितरीत केला जात आहे. त्यामुळे रायगड जिल्हा राज्यासाठी मोठा प्राणवायू पुरवठादार ठरत आहे.

रायगड जिल्ह्यातून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नांदेड, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी तसेच इतर जिल्ह्यांना आत्तापर्यंत प्राणवायूचा पुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यातून होणारा ऑक्सिजनचा पुरवठा वादळातही  सुरळीत सुरु रहावा, यासाठी प्रयत्न सुरु आहेत.  ऑक्सिजनच्या वाहतुकीत अडथळे येउ नयेत, यासाठी संबंधीत अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

सध्या कोविड महामारी सुरू आहे. शासकीय तसेच काही खाजगी रुग्णालयांमध्ये कोविडचे रुग्ण उपचार घेत आहेत. तेथील वीज पुरवठा खंडित होऊ नये, जर वीजपुरवठा खंडित झाला तर ताबडतोब सुरु करण्यासाठी रुग्णालयांमध्ये वीज कर्मचार्‍यांचे पथक ठेवण्यात येणार आहे. रुग्णालयांमध्ये अतिरिक्त रोहित्र ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply