देहू, पैठण : प्रतिनिधी
मोजके वारकरी व मानकर्यांच्या उपस्थितीत जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीने शुक्रवारी (दि. 12) दुपारी साधेपणाने प्रस्थान ठेवले, पण ती पुढे विठूरायाच्या भेटीसाठी निघाली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पालखी मूळ मंदिरातच स्थिरावली. संत एकनाथ महाराजांच्या पैठणमध्येही असेच चित्र पहावयास मिळाले.
पालखी सोहळ्यानंतर संतांच्या पालख्या या पंढरपूरच्या दिशेने मार्गी लागतात, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ही परंपरा मोडत पालख्या मूळ मंदिरातच स्थिरावणार आहेत. टाळ, मृदंग, चिपळ्यांच्या गजरात जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीने देहूच्या मंदिरातून प्रस्थान ठेवले. अवघ्या 50 जणांच्या उपस्थितीत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा रंगला.
यंदाच्या वर्षी कोरोना व्हायरसचे सावट असल्यामुळे पालखी पायवारीतून नव्हे, तर मोजक्या मंडळींसह थेट पंढरपूरात दाखल होणार आहे. विठूरायाच्या भेटीसाठी पायीवारीने जाता न येण्याची नाराजी वारकरी वर्गात असली तरीही देशावर आणि सार्या जगावरच असणार्या या कोरोनारूपी संकटाचा नायनाट व्हावा, अशीच प्रार्थना विठूरायाचरणी ते करीत आहेत.
दुसरीकडे आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणार्या सात मानाच्या पालख्यांपैकी एक संत एकनाथ पालखीनेही मोजक्या वारकर्यांसह प्रस्थान केले आहे. दशमीपर्यंत ही पालखी समाधी मंदिरातच मुक्कामी असणार आहे. डोक्यावर टोपी, गळ्यात टाळ, तोंडाला मास्क आणि 20 वारकर्यांच्या उपस्थितीत नाथाच्या पालखीने दुपारी 1च्या दरम्यान नाथच्या जुन्यावाड्यातून प्रस्थान ठेवले. आता दशमीपर्यंत नाथांची पालखी समाधी मंदिरातच मुक्कामी असेल. रोज शासनाच्या नियमांनुसार भजन-कीर्तन होईल. दशमीला नाथांच्या पादुका वाहनाने पंढरपूरला पाच वारकरी घेऊन जातील.