Breaking News

पेणची मिठागरे लुप्त होण्याच्या मार्गावर

पेण : अनिस मनियार : तालुक्याच्या खाडीपट्ट्यातील आगरी, कोळी लोकांचा पूर्वी मिठाच्या शेतीचा मूळ व्यवसाय होता. एकेकाळी कामगारांनी गजबजलेली येथील मिठागरे आता ओस पडली आहेत. पेण तालुक्यात 30 ते 40 मिठागरांतून आता जेमतेम 5 ते 6 आगारे शिल्लक राहिली आहेत. भविष्यात मिठागरांचा इतिहास पुसला जाणार आणि यापुढे शालेय जीवनात मिठागरे केवळ कागदावरच पाहायला मिळणार की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

पेण तालुक्यात वडखळ, बोरी, शिर्की, वाशी परिसरात मोठ्या प्रमाणावर मिठाची शेती होती. जस-जसा उन्हाळा तापत जातो तसतसे मीठ उत्पादन अधिक प्रमाणात मिळत जाते, हे मिठागरांचे वैशिष्ट्य आहे. मीठ पावसाळ्यात विरघळू नये, म्हणून मे महिन्याच्या अखेरीस मिठाच्या राशी करून त्या व्यवस्थित पेंढ्याने झाकून ठेवण्यात येतात, मात्र अलीकडच्या काळात मिठाच्या राशी फारशा पाहायला मिळत नाहीत.

मीठ फक्त स्वयंपाकातच लगते असे नाही. कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात चामड्याच्या चपला तयार करणारे जे छोटे मोठे कारखाने आहेत, त्यांनाही मोठ्या प्रमाणात मीठ लागते आणि ते जास्तीत जास्त मीठ पेणवरून दळून जात असे, पण मीठ उत्पादन अचानक कमी झाल्याने मीठ गिरण्याही बंद पडल्या. त्यामुळे अनेकांच्या रोजगारावर संकट आले आहे. पेण तालुक्यातील बोरी, मळेघर, उचेडे, उंबर्डे येथील काही स्थानिक बैलगाडीवाले गावोगावी मीठ विकण्याचा धंदा करीत असत, त्यांचाही व्यवसाय मोडीत निघाला आहे. त्यातील काही बैलगाडीवाल्यांना पालघर, ठाणे परिसरातून मीठ आणून आपला व्यवसाय करावा लागत आहे. पेण तालुक्यातील 30 ते 40 मिठागरांपैकी आता जेमतेम 5 ते 6 आगारातच मीठ पिकविले जात असल्याचे नजरेस पडते. शेकडो वर्षापासून सुरू असलेल्या मिठागरांमुळे पूर्वी स्थानिकांत रोजगार मिळवून देत होत्या. आता मिठागरेच बंद पडल्यामुळे स्थानिक व्यावसायिक, मीठ गिरणी कामगार, स्थानिक रोजगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. काळाच्या पडद्याआड चाललेली मिठागरे वाचविण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे अन्यथा भविष्यात केवळ शालेय जीवनात मीठ केवळ कागदावरच पाहायला मिळेल.

पूर्वी पेण तालुक्यात मिठागरांच्या पटावर मिठाच्या राशींचे डोंगर दिसायचे. पावसाळयात कितीही पाऊस पडला, तरी त्या राशीतील मीठ खराब होणार नाही किंवा विरघळणार नाही, याची काळजी घेऊन पेंढ्याने आणि मातीच्या लेपाने त्या राशी सुरक्षित ठेवल्या जात होत्या. आजकाल मोजक्याच मिठाच्या राशी पाहायला मिळतात.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply