पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलावरील खड्ड्यांची पुन्हा डागडुजी करून घेतली आहे. त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. पनवेलमधील तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. एमएसआरडीसी विभागाला या खड्ड्यांचे काम करण्यास सांगण्यात आले होते, मात्र त्यांच्याकडून कामात दिरंगाई होत होती. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी ऑगस्ट महिन्यात स्वखर्चाने या उड्डाणपुलावरील सर्व खड्ड्यांची दुरुस्ती केली होती. वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे या उड्डाणपुलावरील रस्त्याला पुन्हा खड्डे पडल्याचे दिसून आले. याची दखल घेत परेश ठाकूर यांच्यामार्फत पुन्हा खड्डे बुजवण्यात आले. याबद्दल प्रवासी, वाहनचालकांनी त्यांना धन्यवाद दिलेत.