Breaking News

बोडणी गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य

अलिबाग : प्रतिनिधी : तालुक्यातील बोडणी कोळीवाड्यात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. येथे पाण्यासाठी मारूतीच्या शेपटाप्रमाणे लागलेली लांबचलांब  हंड्यांची रांग ही येथील पाणी टंचाईची तीव्रता दाखवित आहे.  अलिबाग तालुक्यातील बोडणी हे गाव समुद्रालगत आहे. चारशेहून अधिक लोकवस्ती असलेल्या या गावात पाण्याची मुबलक सुविधा नाही. वाढत्या वस्तीला पुरेल इतके पाणी दररोज उपलब्ध होत नसल्याने कोळी भगिनींना पाण्याासाठी वणवण करावी लागत आहे. जानेवारीपासूनच पाणीटंचाईला हळूहळू सुरूवात होते आणि  एप्रिल-मे मध्ये तिची तीव्रता वाढते. सध्या या गावात तीव्र पाणी टंचाई आहे.

बोडणी गावाच्या प्रवेशद्वारावरच भारत निर्माण योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या 2 मोठ्या पाण्याच्या टाक्या पहायला मिळतात. मागील वर्षी या टाक्या कार्यान्वित झाल्या. मात्र तरीही गावकर्‍यांची तहान भागविण्यास त्या पुरेशा ठरत नाही.

बोडणी गावात चारशेहून अधिक उंबरठे आहेत. दिवसेंदिवस घरांची आणि माणसांची संख्याही वाढत आहे. त्या तुलनेत मिळणारे पाणी हे अपुरे पडते. एकावेळी दोन हंडे याप्रमाणे पाणी मिळते. पुन्हा नंबर येईल, तेव्हा पाणी असेलच याची शाश्वती नाही.

रेवस पाणी पुरवठा अंतर्गत मिळणारे पाणी हे दररोज मिळेल, याची शाश्वती नाही. मागील वर्षीचा कमी झालेला पाऊस, जलवाहिनींची दुरूस्ती, एमआयडीसीकडून कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा ही कारणे अपुर्‍या पाणीपुरवठ्याबाबत समोर येत आहेत. परिणामी गावकर्‍यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. तर काही गावकरी विकतच्या पाण्यावर आपली तहान भागवितात.

Check Also

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपच्या निरंजन डावखरेंची विजयी हॅट्ट्रिक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार …

Leave a Reply