कोरोनामुळे देशातील सर्वच क्षेत्राला झळ पोहचली. क्रीडाक्षेत्रदेखील त्याला अपवाद नाही. दोन वर्षे सर्व खेळांच्या स्पर्धा बंद होत्या. आता शासनाने निर्बंध उठवल्यामुळे खेळांच्या स्पर्धा पुन्हा सुरू झाल्या आहेत. रायगडचा विचार केल्यास कबड्डी हा या जिल्ह्यातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. या खेळाच्या स्पर्धा आता सुरू झाल्या आहेत. त्यामुळे खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दोन वर्षानंतर जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धादेखील घेण्यात येत आहेत. ही चांगली बातमी आहे. विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यात दोन दिवसांमध्ये जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धा घेतली जात होती. यंदापासून पुरुष निवड चाचणी स्पर्धा चार गट करून चार ठिकाणी खेळवली जात आहे. त्यातील अव्वल 16 संघांची स्पर्धा खेळवून त्यातून विजेता संघ निवडला जाणर आहे. हा रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनने घेतलेला एक चांगला निर्णय आहे. यापूर्वीच हा निर्णय घ्याला हवा होता, थोडा उशिरा घेतला, तरी तो योग्य निर्णय आहे. देरसे आये दुरुस्त आये. रायगड जिल्ह्यात सुमारे 350 कबड्डी संघ आहेत. त्यांची निवड चाचणी स्पर्धा घेणे हे एक आव्हानच असतं. इतक्या संघांची स्पर्धा एकाच ठिकाणी दोन दिवसात खेळवल्यामुळे खेळाडूंबरोबरच पंच व कार्यकर्त्यांचीदेखील दमछाक होते. आता 256 संघांची चार गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. चार गटांचे सामने चार ठिकाणी खेळवले जाणार आहेत. प्रत्येक गटांतील अव्वल चार संघ निवडून त्या 16 अव्वल संघांची स्पर्धा खेळवली जाणार आहे. यामुळे खेळाडूंना व पंचांना विश्रांती मिळेल. त्याचबरोबर स्पर्धा पाहण्यासाठी होणारी गर्दी विभागली जाईल. ज्या भानगडी होतात, त्या कमी होतील. त्यामुळे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या या निर्णयाचे स्वागत करायला हवे. या निर्णयाचे स्वागत करत असताना स्पर्धा आयोजनाबरोबरच इतरही बाबतीत कबड्डी असोसिएशनने धोरणात्मक निर्णय घ्यायला हवेत. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशने संघांची वर्गवारी करून निवड चाचणी खेळावायला हवी. जे नवीन संघ असतील किंवा वर्ष भरातील स्पर्धामध्ये ज्यांची कामगिरी चांगली नाही अशा संघांना ब गटात टाकून त्यांची वेगळी स्पर्धा घ्यायला हवी. जे अव्वल 64 संघ असतील त्यांची वेगळी निवड चाचणी खेळवायला हवी. त्यामुळे जे नवीन संघ आहेत, त्यांना विजेते पदाचा आनंद घेता येईल. ब गटाच्या चाचणीतील अव्वल 16 संघांना पुढील हंगामत अ गटात प्रवेश द्यायचा. स्थानिक स्पर्धादेखील अ आणि ब गटांच्या वेगळ्या खेळवायला हव्यात. महिलांच्या कबड्डी स्पर्धांना प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक स्थरावर जास्तीत जास्त महिला संघांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, तसेच व्यावसायिक संघांचीदेखील वेगळी निवड चाचणी घ्यायला हवी. पूर्वी व्यावसायिक संघांची वेगळी स्पर्धा व्हायची. खेळाडूंच्या बेशिस्तीला लगाम घालण्यासाठी कडक धोरण अवलंबले पाहिजे. रायगड जिल्ह्यात कबड्डी स्पर्धेत जेवढ्या भानगडी होतात, तेव्हढ्या भानगडी इतर कोणत्याही जिल्ह्यात होत नाहीत. याला खेळाडू जबाबदार आहेतच त्याचबरोबर रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनदेखील जबाबदार आहे. काही केले तरी आपले कुणी काहीच करू शकत नाही, असे या खेळाडूंना व संघांना वाटते. याचे करण असोसिएशन बोटचेपे धोरण घेते. त्यामुळेच हे संघ बेशिस्त वागतात. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनने बेशिस्त खेळाडू व संघांची दादागिरी वेळीच बंद केली पाहिजे. खेळाडूंच्या भानगडींमुळे रायगडची बदनामी होतेय. स्थानिक स्पर्धा तर सोडाच जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेतदेखील मारामार्या होतात. हे थांबलं पाहिजे. जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा ही रायगड जिल्हा असोसिएशची असते. त्यामुळे या स्पर्धेची सर्वस्वी जबाबदारी ही असोसिएशनची असते. स्पर्धेच्या वेळी असोसिएशचे सर्व पदाधिकरी उपस्थित असतात. तरीदेखील मारामार्या होतात. एवढे धाडस खेळाडूंमध्ये येत कुठून. असोसिएशन हा बेशिस्तपणा खपवू तरी का घेते. बेशिस्त खेळाडूंवर कारवाई झालीच पाहिजे. जर एखाद्या संघातील खेळाडू बेशिस्त वागत असेल तर त्या खेळाडूबरोबरच संघावरदेखील कारवाई केली पाहिजे. भानगडी करणार्या संघांना किमान एक वर्ष बंदी घातली पाहिजे. बेशिस्त संघ, मग तो कोणताही असो, त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. बहुतेक वेळा पंचांच्या निर्णयाचे कारण देऊन मैदानावर वाद घातले गेले. पंचावर हात उचलाला गेला. पंच हा माणूस आहे. त्याच्याकडूनदेखील चुका होऊ शकतात, हे मान्य असते, परंतु आम्हाला वादच करायचा असतो, भानगडी करायच्या असतात. त्यामुळे पंचाचा निर्णय हे एक निमित्त सापडते. पंचांवर हात उचलला जातो तरी असोसिएशन काही करत नाही तर पंचांनी दाद मागयची तरी कुठेे. असोसिएशने पंचांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिलेच पाहिजे.
खेळाडूंना विमा संरक्षण द्या
कबड्डी खेळात खेळाडूंना दुखापत होण्याचे प्रमाण जास्त आहे. दुखापतींमुळे अनेक खेळाडूंची कारकीर्द संपली आहे. खेळाडू जखमी झाल्यास त्याच्यावर इलाज होत नाहीत. उपचार महागडे असल्यामुळे गावठी इलाज करून खेळाडू गप्प बसतात. या जखमी खेळाडूंना चांगले उपचार मिळाले पाहिजेत. त्यासाठी खेळाडूंचा अपघात विमा काढला पाहिजे. ती जबाबदारी त्या त्या संघांवर सोपवली पाहिजे. खेळाडूंचा अपघात विमा काढण्यासाठी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनने पुढाकार घ्यायला हवा. गरीब कबड्डी खेळाडूंना चांगले उपचार मिळू शकतील. त्याची कारकीर्द तरी संपणार नाही.
-प्रकाश सोनवडेकर