Breaking News

काँग्रेसला मलई; तर आम्हाला देशाची भलाई हवी -नरेंद्र मोदी

आलो (अरुणाचल प्रदेश) : वृत्तसंस्था

काँग्रेसचे दिल्लीत सरकार असो किंवा एखाद्या राज्यात त्यांना देशाच्या, जनतेच्या भल्याशी देणे- घेणे नसून भ्रष्टाचार करून फक्त पैशांची मलई कशी चाखता येईल याकडेच त्यांचे लक्ष आहे. त्यांना मलई हवी आहे, तर आम्हाला देशाची भलाई, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेशातील आलो येथे मोदींनी शनिवारी

(दि. 30) प्रचार सभा घेतली. या वेळी त्यांनी विरोधकांवर घणाघात केला.

लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. अरुणाचल प्रदेशमधील आपल्या भाषणात मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली. काँग्रेसच्या नेत्यांनी सत्तेत असताना कायम स्वत:ला पैसा कसा मिळेल यावरच लक्ष केंद्रित केले आहे. कोणत्या योजनेतून कसा पैसा खाता येईल, संरक्षणविषयक करार असेल तर दलाली करून पैसे खाणे एवढेच त्यांना माहीत होते. जेव्हा जेव्हा देशासाठी चांगली कामे झाली, तेव्हा त्यांचे चेहरे पडले आहेत, असे म्हणत मोदी सरकारवर सतत भ्रष्टाचाराचे आरोप करणार्‍या काँग्रेसवर पंतप्रधानांनी पटलवार केला.

काँग्रेसची नेहमीच भ्रष्टाचाराबरोबर आघाडी राहिली आहे. हा सर्वांना बांधून ठेवणारा ‘फेव्हिकॉल करप्शन’ आहे. त्यांचे नेते गरिबांची थाळी चोरतात. त्यांचे दिल्लीत बसलेले नेते आयकर चोरतात. वृत्तपत्र चालवण्यासाठी दिलेल्या जमिनीतून लाखो रुपयांचे भाडे कमावतात. संरक्षण व्यवहारात दलाली घेतात. स्वत: जामिनावर आहेत. जे जामिनावर आहेत, ते चौकीदाराला शिव्या देत आहेत, याकडेही पंतप्रधान मोदींनी लक्ष वेधले. ना हे देशाच्या जवानांची चिंता करतात, ना युवकांची. भारत जेव्हा केव्हा मोठे यश मिळवतो, तेव्हा नामदार आणि त्यांच्या दरबारी लोकांचे चेहरे पडतात. फक्त अश्रू ढाळणेच शिल्लक राहिलेले असते. सर्जिकल स्ट्राइकच्या वेळी तुम्ही सर्वांनी हे पाहिले आहे. जेव्हा भारताने दहशतवाद्यांना घरात घुसून मारले, तेव्हा त्यांची वर्तणूक काय होती. जेव्हा आमचे वैज्ञानिक जगाला आश्चर्यचकित करतात, तेव्हा हे त्याची खिल्ली उडवतात. ज्यावर आपल्याला अभिमान वाटतो, त्याचे त्यांना दु:ख होते, असेही मोदी म्हणाले. प्रचार सभेदरम्यान मोदी यांनी काँग्रेसवर टीका करताना आपल्या सरकारच्या चांगल्या कामांचे कौतुक करीत पाठ थोपटली. अरुणाचल प्रदेशला भारताच्या रेल्वे नकाशावर आणण्याचे सौभाग्य मला मिळाले. इतर विकासकामेही केली. उत्तर पूर्वमध्ये कमळ फुलण्याची सुरुवात इथूनच झाली होती. केंद्रात मला आणि अरुणाचलमध्ये पेमा खांडू यांना पुन्हा एकदा निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी स्थानिकांना केले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply