नवी मुंबईतील चौकसभा, रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद
नवी मुंबई ः बातमीदार
युती सरकारच्या काळात मराठा समाजाला मिळालेले आरक्षण सुप्रीम कोर्टात न टिकल्याने अखेर रद्द झाले आहे. त्याची झळ मराठा समाजातील तरुणांना बसणार आहे. विद्यमान मविआ सरकारला हे आरक्षण टिकवता न आल्याने मराठा समाजात असंतोष पसरला असून, सरकारविरोधातील रोष व्यक्त होत आहे. त्यानुसार मुंबई, पालघरनंतर नवी मुंबईत रविवारी (दि. 22) मराठा क्रांती मोर्चा नवी मुंबईच्या वतीने ठिकठिकाणी चौकसभा व रॅली काढून सरकारचा निषेध करून जनजागृती करण्यात आली.
मविआ सरकारविरोधात मराठा समाजाकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यानुसार राज्यभर चौकसभा व रॅली काढण्यात येत आहे. मुंबई, पालघरपासून त्याची सुरुवात झाली आहे. त्यानुसार नवी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी सकाळी 10 वाजता चौकसभेपासून जनजागृतीची सुरुवात करण्यात आली. कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, कळवा, नेरूळ येथे चौकसभा व रॅली काढण्यात आली.
सध्या कोरोना संसर्गाच्या दुसर्या लाटेची शक्यता वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचे सर्व नियम पाळत चौकसभा व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश कदम, बाळासाहेब शिंदे, विनोद पार्टे, अॅड. राहुल पवार, अरुण पवार, जिल्हा समन्वयक विनोद साबळे, वीरेंद्र पवार, दिलीप जगताप, गणेश गायकवाड व मराठा समाजाचे नागरिक उपस्थित होते.