Breaking News

माथेरानमध्ये पोलीस व्हॅनला परवानगी देण्याची गरज

कर्जत : विजय मांडे

माथेरान हे जगभरातील पर्यंटकांचे आवडते पर्यटनस्थळ आहे. तेथे बारमाही पर्यंटकांची वर्दळ असते. हे एकमेव पर्यटनस्थळ असे आहे की जिथे मोटार वाहनांना बंदी आहे. ब्रिटिशाचे कायद्याचे पालन आजही तेथे केले जाते. 2003 साली माथेरान पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये केवळ अग्निशमन दलाची गाडी व रुग्णवाहिका यांना परवानगी देण्यात आली. माथेरानमध्ये वाहन म्हणून घोडा तसेच हात रिक्षेला परवानगी आहे.

माथेरानमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण कमी असले तरी कधीतरी गंभीर गुन्ह्याची नोंद होते. त्यावेळी घटनास्थळी पोहोचण्यासाठी पोलिसांना घोड्याचा वापर करावा लागतो. तत्कालीन रायगड पोलीस अधीक्षक टी. एस. भाल तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गांगुर्डे असताना 1992 साली तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी माथेरान पोलीस दलासाठी घोड्याची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन माथेरान पोलीस ताफ्यासाठी नाशिक जिल्ह्यातील यवलामधून दोन उमदे घोडे आणले होते. एकाचे नाव ब्राऊनी तर दुसरा ब्लॅकी. यातील ब्लॅकी हा घोङा 2006 साली मरण पावला. त्याची समाधी माथेरान पोलीस ठाण्याच्या आवारात बांधण्यात आली आहे. त्यावर तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सदानंद वायसे-पाटील यांनी व इतर पोलिसांनी श्रद्धांजली वाहिलेला मजकूर ब्लॅकीच्या सेवेची आजही साक्ष देत आहे. तर ब्राऊनीने वयोवृद्ध होईपर्यंत पोलिसांची सेवा केली. ही जोडी पोलीस ठाण्यात येणार्‍या वरिष्ठ अधिकार्‍यांचे लक्ष वेधून घेत होती.

आजही माथेरान पोलीस ठाण्यामध्ये दोन घोडे आहेत. परंतु येथे येणार्‍या काही अधिकार्‍यांना प्रशिक्षण  नसल्याने घोडा चालवणे जमत नाही. तसेच संपुर्ण माथेरान हे जंगल तसेच दर्‍याखोर्‍यात असल्याने एखादी घटना घडली तर पोलिसांना घटनास्थळी पोहचण्यासाठी वेळ लागतो. आरोपीला न्यायालात हजर करण्यासाठी पोलीस ठाणे ते दस्तुरी नाका हे चार किलोमीटरचे अंतर आरोपीसह पोलिसांना चालत जावे लागते. चालत जाताना आपण केल्याच्या गुन्ह्यामध्ये आपल्याला शिक्षा होईल किंवा पश्चात्तापाने एकाद्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या हातातून पळून जाऊन बाजूच्या दरीत उडी मारू शकतो. अशा वेळी आरोपीला न्यायालयात ने-आण करताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते.

अत्यावश्यक असेल तेव्हा निदान आरोपीला न्यायालयात हजर करण्यासाठी किंवा घटनास्थळी पोहचण्यासाठी माथेरानमध्ये पोलीस व्हॅनकरिता परवानगी दिल्यास काही प्रमाणात समस्या दूर होऊन गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांसाठी जमेची बाजू ठरू शकते. तसेच एखाद्या गंभीर गुन्ह्याची उकल लवकर करता येऊ शकते.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply