मुरूड : प्रतिनिधी
पर्यावरणचा समतोल राखण्यासाठी लोकसहभाग व इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आवश्यक आहे. महावितरणकडून इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशन्ससाठी अत्यंत माफक दरात वीज उपलब्ध आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करून पर्यावरणस्नेही झाले पाहिजे, असे प्रतिपादन महावितरणचे प्रकल्प संचालक भालचंद्र खंडाईत यांनी येथे केले.
महावितरण आणि ब्युरो ऑफ एनर्जी इफिसीएनसी(बीईई) यांच्या संयुक्त विद्यमाने मुरूडमध्ये ‘गो इलेक्ट्रिक’ या इलेक्ट्रिक व्हेकल रोड शोचे आयोजन करण्यात आले होेते. त्यावेळी खंडाईत बोलत होते.
भालचंद्र खंडाईत यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर या रोड शोला प्रारंभ झाला.
पर्यावरण संरक्षण करण्यात इलेक्ट्रिक वाहनांचा सहभाग फार मोलाचा आहे. इलेक्ट्रिक वाहन वापरणार्या लोकांना राज्य व केंद्र शासनान अनेक सवलती दिल्या आहेत. चार्जिंग स्टेशनची उपलब्धता वाढविण्यात येणार असून, त्यासाठी महावितरणला नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले असल्याची माहिती महावितरणचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांनी यावेळी दिली.
महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्यांनी यावेळी पर्यावरण संरक्षण व त्यात इलेक्ट्रिक वाहनांचा सहभाग या विषयावर एक पथनाट्य सादर केले. यावेळी महावितरणचे मुख्य महाव्यवस्थापक भारत जाडकर व भांडूप परिमंडळाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर उपस्थित होते.