Breaking News

शिवसेनेतील गृहकलह

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील एक घटक पक्ष असलेली शिवसेना या ना त्या कारणाने चर्चेत असते. सध्या याच पक्षाच्या दोन नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला असून माजी मंत्री रामदास कदम यांनी विद्यमान मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप करून राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

शिवसेना ही चार अक्षरी पक्षसंघटना म्हणजे एके काळी जणू अंगार होता. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणसाला केंद्रबिंदू मानून शिवसेनेची वाटचाल सुरू झाली. हळूहळू हा पक्ष राज्यात पाय रोवू लागला. 1989 साली शिवसेना-भाजप युती झाली आणि प्रादेशिक पक्ष म्हणून कार्यरत असणार्‍या शिवसेनेला राष्ट्रीय स्तरावरही ओळख मिळाली. पुढे सन 1995मध्ये राज्यात पहिल्यांदा शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आले, तर 1999 साली अस्तित्वात आलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद व लोकसभेचे अध्यक्षपदही मिळाले होते. राज्यात 2014 साली काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत बिघाडी झाली, तर दुसरीकडे शिवसेना व भाजप यांचीही युती तुटली. दोन्ही पक्ष वेगळे लढले, परंतु विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा एकत्र येत त्यांनी युतीचे सरकार स्थापन केले. 2019 साली दोन्ही पक्षांनी एकत्र विधानसभा निवडणूक लढवली, मात्र मुख्यमंत्रीपदावरून दोघांमध्ये वाद झाला व शिवसेनेने युती तोडली. त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या परस्परविरोधी वैचारिक भूमिका असलेल्या पक्षांबरोबर महाविकास आघाडी स्थापन केली व उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे 19वे मुख्यमंत्री झाले. ते सध्या पक्षप्रमुख व मुख्यमंत्री अशी दोन पदे भूषवित आहेत. अशा वेळी शिवसेनेची वाढ होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र पक्षातील प्रकरणेच समोर येत आहेत. बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेत कडक शिस्त होती. त्यामुळे त्या काळी काही नेते पक्ष सोडून गेले, तरी शिवसेनेची वाटचाल सुरूच राहिली. बाळासाहेबांचा दरारा व वचकच तेवढा असे. तो उद्धव यांच्याकडे नाही. ते मूळचे छायाचित्रकार. बाळासाहेबांनी त्यांना आपला उत्तराधिकारी म्हणून जाहीर केले. यामुळे नारायण राणे, राज ठाकरे यांसारखे अनेक जण दुखावले गेले आणि त्यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. तरीही बाळासाहेब हयात असेपर्यंत शिवसेनेत एक ऊर्जा होती. तिचीच उणीव आता भासतेय. सक्षम नेतृत्वाअभावी पक्षात कुणावरही अंकुश राहिलेला नाही. म्हणूनच जो तो स्वार्थ आणि हितसंबंध पाहतोय. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेले संजय राठोड यांना एका तरुणीशी असलेले कथित संबंध आणि तिच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी राजीनामा द्यावा लागला. आता रामदास कदम आणि अनिल परब या दोन नेत्यांमधील वाद समोर आला आहे. राजकीय पक्षात मतांतरे, कुरबुरी होतच असतात, पण कदम विरुद्ध परब यांच्यातील टोकाचा वाद पाहता पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एकीकडे पक्षाची पिछेहाट होत असताना आता अंतर्गत वाद उफाळून येत असतील ते पक्षाच्या दृष्टीने योग्य नाहीत. सध्या सत्ता आहे म्हणून बाकीचे गप्प आहेत, पण सत्ता गेल्यावर तेही शांत बसणार नाहीत. पक्षसंघटनेच्या वाटचालीसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply