जळगाव ः प्रतिनिधी
जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना हेमा मालिनी यांचा संदर्भ देत आक्षेपार्ह विधान केले. त्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भरसभेत हेमा मालिनी यांच्या गालांची तुलना रस्त्यांशी केली. हेमा मालिनीच्या गालांसारखे रस्ते मी केले, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. गुलाबराव पाटील यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेत मंत्री पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांना नेमकं झालंय काय? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला नाही, तर गाल पाहणार्यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही वाघ यांनी दिला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनीही जाहीर माफी मागा; अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असा इशारा मंत्री पाटील यांना दिला आहे. त्यामुळे मंत्री पाटील अडचणीत आले आहेत.