Breaking News

सामाजिक जाणीवांचे प्रेरणा भवन : लोकनेते रामशेठ ठाकूर भवन

27 डिसेंबर 2021 रोजी सकाळी ‘लोकनेते रामशेठ ठाकूर भवन ‘या इमारतीचे उद्घाटन मा.शरदरावजी पवार यांचे हस्ते होत आहे.छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विषयाचे माजी विद्यार्थी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सत्कार्याचा परिचय करून देणारा हा संक्षिप्त लेख…

छत्रपती शिवाजी कॉलेज हे रयत शिक्षण संस्थेचे पहिले कॉलेज. जून 1947 पासून हे कॉलेज सुरु झाले.निवासी आणि कमवा आणि शिका योजनेत काम करून शिकण्याचा संस्कार करणारे हे स्वावलंबी शिक्षण देणारे कॉलेज अनेक गरीब होतकरू विद्यार्थ्यांचा आधार झाले.महाराष्ट्र तसेच कर्नाटक मधून अनेक विद्यार्थी इथे शिकून गेले.आज काश्मीरमधून काही विद्यार्थी इथे शिकायला येत आहेत.गरिबीतून शिक्षण घेतलेले जिद्दी विद्यार्थी या मातीत घडले.फलटण निवास आणि त्या पुढील खोल्यात त्यांची जडणघडण झाली.सामाजिक सेवेचा संस्कार,आणि कर्मवीरांच्या जीवनाचा आदर्श घेऊन अनेकांच्या जीवनात परिवर्तन करण्याचेकामयाकॉलेजमध्ये झाले. राजकारणी, कलावंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू,विचारवंत, वकील, कुलगुरू, नेते शिक्षणतज्ञ, प्रशासकीय अधिकारी अशा अनेकविध क्षेत्रात इथली मुले चमकली. मराठी,हिंदी, इंग्रजी, संस्कृत, अर्धमागधीया भाषा आणि भूगोल,राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र, तर्कशास्त्र, एन.सी.सी .जिमखाना विभाग यातून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यार्थी गेले. प्रशासन अधिकारी मोठ्या प्रमाणात झाले. गावाकडून पत्र्याची पेटी आणि एखाद दुसरा सदरा,इजार घेऊन आलेले ,आणि कष्ट करून शिकणारे यात जास्त होते. निर्व्यसनी ,रयतेची सेवा करणारे,आपला केवळ स्वार्थ न साधता लोककल्याण करण्याची भावना जपणारे अनेक मुली आणि मुले या कॉलेजमधून बाहेर गेली. ती अजूनही हयात आहेत ते न विसरता कॉलेजला भेट देतात.याच जाणीवेचा मोठ्या मनाचा एक विद्यार्थी या कोलेजला मिळाला.रयत शिक्षण संस्थेचा कसलाही लाभ न घेता संस्थेला मनापासून देण्याची भावना असणारा हा विद्यार्थी म्हणजे रामशेठ चांगू ठाकूर साहेब.

आज हा लेख लिहिण्याचे प्रयोजन म्हणजेछत्रपती शिवाजी कॉलेजच्या प्रांगणात बांधण्यात आलेली भव्य अशी पाच मजली इमारत ज्या बिल्डींगचे नाव रयत शिक्षण संस्थेनेसन्मानाने ‘’लोकनेते रामशेठ ठाकूर भवन’ असे ठेवलेले आहे. ही इमारत  36 हजार स्क्वेअर फुटाची आहे.तळमजला धरून पाच मजली असणारी ही इमारत आणि छत्रपती शिवाजी कॉलेजच्या कार्यालयाचे नुतनीकरण करून भव्य सुंदर इमारत,आणि सुंदर कार्यालय तयार करण्यात आले आहे.आपल्या कॉलेजला स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी इमारत नाही, आपल्या कॉलेजला पदव्युत्तर शिक्षण व संशोधन केंद्रासाठी इमारत नाही, हे कळल्यावर स्वतःच्या इच्छेने 9 कोटी पर्यंतचा खर्च करून,स्वतः वारंवार भेटी देऊन ही इमारत लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांनी बांधून दिली आहे. आई वडिलांची काळजी घेणारा मुलगा जसा आस्थेने,ममतेने  आई वडिलांनाना जपत असतो तसेच रामशेठ यांची माया छत्रपती शिवाजी कॉलेज आणि रयत शिक्षण संस्थेवर आहे. 27 डिसेंबर 2021रोजी  सकाळी 11 वाजता माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरदरावजी पवारसाहेब  यांच्या हस्ते’ इतर मान्यवरांच्या उपस्थितीत लोकनेते रामशेठ ठाकूर भवन’या इमारतीचे उदघाटन करण्यात येत आहे.

नव्या युगात विद्यार्थी म्हणून कॉलेजशी कृतज्ञ  कसे रहावे याचेस्मारकच जणू ही इमारत आहे. कष्ट करून स्वाभिमानाने रहावे, आपल्या अगोदरच्या काम केलेल्या कार्यकर्त्याचा आदर कसा करावा,साधेपणाने राहून  समाजातील सर्व घटकांशी मैत्री भावना कशी जपावी, सुख दुःखात सहभागी कसे व्हावे,चांगल्या गोष्टीची कदर कशी करावी हे सारे रामशेठ ठाकूर साहेब  याचेकडून घेण्यासारखे आहे. द्वेषाचे राजकारण खेळत बसण्यापेक्षा सहकार समन्वय करून चांगली कार्ये करून घ्यावीत ही रयत मध्ये शिक्षण घेतलेल्या त्यांची  सदोदित  भावना आढळते. लोकनेते रामशेठ ठाकूर भवन ही इमारत  अनेक पुढच्या पिढ्यांना दानशूरतेचा वारसा देईल. विशेषतः छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याने एवढी मोठी इमारत बांधून दिलेली नाही. 28 रूम,लिफ्ट, फायर सिस्टीम,इत्यादी आधुनिक बाबीकडे काम करताना लक्ष देण्यात आले आहे इमारतीपुढे लॉनलावण्यात आली आहे. साई नर्सरी यांचेकडून फॉक्स टेल पाम ,गोल्डन सायप्रस,आय्क्झोरा ,टिकोमा ऑरेंज,कावडी ,जाकोबिना ,ड्रेसिना ,अरंथेमुम,फायकस ,बांबू ,टर्मिनालीस ,पेन्सिल पाईन,लांटेना,क्रोटोन्स इत्यादी झाडे लोकनेते रामशेठ ठाकूर भवन व कॉलेज प्रांगणात लावण्यात आली आहेत. त्यामुळे परवा सातारा जिल्हा युवा महोत्सवासाठी आलेल्या विविध कॉलेजच्या विद्यार्थ्यांना खूप आनंद मिळाला आहे. देखणी सुबक वास्तू आणि सुंदर निसर्ग यांचा संगमच इथे झाल्याने शिवाजी कॉलेजमध्ये आमुलाग्र बदल झाला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या देवापूर येथील वसतिगृहात व छत्रपती शिवाजी कॉलेजच्या कमवा आणि शिका योजनेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी फिरोज मेटकरी यांनी लोकनेते  रामशेठ ठाकूर भवन मध्ये व्हर्टिकल गार्डन तयार करून दिले आहे.महाविद्यालयाचे सौंदर्य वाढविण्यासाठी विविध फुलझाडे,लॉन ,इनडोआर प्लांट,व्हर्टिकल गार्डन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आले आहे.शिसम ,सोनचाफा ,कुडीका चाफा .गोल्डन सायप्रस,पेट्रा वनस्पतींची ची लागण केली आहे..लॉन हे उद्यानाचे नाक आहे. लॉनमध्ये फुलझाडे तसेच रॉकरी करण्यात आली आहे.लॉनमध्ये शॉवर बसवण्यात आले आहेत.प्रत्येक स्मारकासमोर लॉन तयार केली असून टूरांटा,जट्रोफा,पेंडान्स व गोल्डन टूरांटा लावण्यात आला आहे.लोकनेते रामशेठ ठाकूर भवन च्या तळमजल्यात जिथे उद्घाटन समारंभाच्या नावाचा संगमरवरी फलक असेल त्याच्या सभोवती व्हर्टिकल गार्डन तयार करून विविध शोभेच्या वेली लावण्यात आल्या आहेत.ग्रीन मनी प्लांट ,यलो मनी प्लांट ,सिंगोनियामचे कोकोपीट लावण्यात आले आहे. या इमारतीच्या समोर सभोवार रम्य असा सुंदर निसर्ग उभा राहून वातावरण प्रसन्न झाले आहे.

न्हावे खाडी हे त्यांचे मूळ गाव.ते पुढे गव्हाणला स्थायिक झाले..रामशेठ  ठाकूर यांनी आपल्या चांगुलपणाने महाभारतातल्या कर्णाला लाजवेल असे काम करून रयतेची मायामिळवली आहे.आपल्या समंजस स्वभावाने अनेक लोकांच्या हृदयात त्यांनी स्थान मिळवले आहे. गव्हाण येथे माध्यमिक शिक्षण घेताना त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती.उदरनिर्वाहासाठी खाडीतील गहू गोळा करायचे, रेल्वेच्या कामावर रोजाने जायचे,जंगलातून लाकडे आणायची,वह्या पुस्तके बाईन्दिग करून त्यांनी शिक्षण घेतले. गरिबीच्या जाणीवेतून ,आणि आईवडिलांच्या प्रेरणेने ते शिक्षणाकडे वळले.रामशेठ ठाकूर  हे मॅट्रीकची परीक्षा पास झाल्यानंतर परिसरात कोठेही कॉलेज नसल्यामुळे त्यांना पुढील शिक्षणासाठी सातारला पाठवण्यात आले.  साधारण 1968 ला ते पास झाल्यानंतर पुढे चार वर्षे ते सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये पी.डी. साठी एक वर्षे आणि बी.ए.पदवी साठी तीन वर्षे असे मिळून चार वर्षे ते छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये शिकत होते. छत्रपती  शिवाजी कॉलेजच्या 68-69 या शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थी रजिस्टर मध्ये 313 क्रमांकला त्यांच्या प्रवेशाची आणि कॉलेज सोडल्याची नोंद आढळते. त्यांचे पूर्ण नाव राम चांगू ठाकूर. वडिलांचे नाव चांगू काना ठाकूर.रजिस्टर मध्ये त्यांच्या गावाचा उल्लेख ‘गव्हाण’असा  असून ते पनवेल तालुक्यात येते.पूर्वीचा कुलाबा जिल्हा.आज रायगड जिल्ह्यात हे गाव आढळते.  त्यांची जन्मतारीख 2 जून 1951 अशी आहे. श्री छत्रपती शिवाजी विद्यालय गव्हाण येथे त्यांचे मॅट्रीकपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी  छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे 15 जून 1968 ला प्रवेश घेतला. कमवा आणि शिका मध्ये त्यांचे शिक्षण झाले.बी.ए.ला मराठी विषयात त्यांनी पदवी घेतली. पदवीला त्यांना सेकंड क्लास मिळाला. सातारा येथील पत्रकार दिनकर झिंब्रे यांनी सातार्‍यात आम्ही छत्रपती शिवाजी कॉलेजच्या विद्यार्थी वसतिगृहा दोन वर्षे राहत असल्याचे सांगितले. या कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर 24 -8-2021 रोजी त्यांचा टी.सी.शिवाजी विद्यापीठाकडे पाठविल्याची नोंद मिळते.टी.सी .क्रमांक 660 आणि 661 हा शिवाजी विद्यापीठाकडे पाठविला आहे.तसेच  मायग्रेशन प्रमाणपत्र देखील यावेळी पाठवण्यात आले आहे .या संदर्भीय माहितीनुसार 15-6 -1968 ते 24 -8 -1972 या चार वर्षाच्या काळात राम ठाकूर हे छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. हा काळ त्यांच्या जडणघडणीत खूप महत्वाचा आहे,या काळातील साधी राहणी,समतेने राहणे,स्वावलंबी होणे ,संयमित जीवन जगणे ,गुरुजन यांचा आदर करणे,नैतिक दृष्ट्या चांगले आचरण करणे हे सारे त्यांना घराबरोबर या कॉलेजमध्ये मिळाले .ग्राउंडवर खेळलेले खेळ,मित्रांनी वडाच्या झाडाखाली बसून एकमेकांनी केलेल्या चर्चा,डॉ.द.ता.भोसले ,डॉ.र.बा.मंचरकर.प्रामा.के.यादव यांनी दिलेली व्याख्याने त्यांना अजून आठवतात ,संतसाहित्याचा पेपर अजूनही डोळ्यात उभा राहतो . कमवा आणि शिका योजनेतील  जीवन त्यांना आठवते

कर्मवीर अण्णा 9 मे 1959 साली ह्या जगातून निघून गेले.कर्मवीर अण्णा यांनी केलेल्या कामाने प्रभावित झालेले विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या संस्काराचे  बळ त्यांना मिळालेले दिसते.समाजाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून सर्वत्र रामशेठ ठाकूर यांचा उल्लेख केला जातो.महाविद्यालयीन जीवनात संस्कार  घेण्यासाठी तेजिज्ञासू होते.वसतिगृहात असताना ताट वाजवत पण ओळीने जेवण घ्यायचे.शिवाजीराव भोसले यांची व्याख्याने ऐकण्यासाठी ते कराड, कोल्हापूर या ठिकाणी जात.प्राचार्य बापूसाहेब उनउने यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव त्यांचेवर होता. प्रा.नारायणराव भगरे ,प्रा.,आर.डी.गायकवाड हे इतिहास विषय शिकवीत  होते तर प्रा.श्रीधर हेरवाडे मराठी विषय  खूप चांगले शिकवत असत.

छत्रपती शिवाजी कॉलेजचे बी.ए .पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी प्रारंभी  हायस्कूलमध्ये  शिक्षक म्हणून काम केले. 3 वर्षे वाशीला शिक्षक म्हणून काम केल्यानंतर  शिक्षक पेशा सोडून त्यांनी व्यवसायात प्रवेश केला.सुरवातीस 10-12 हजाराची कामे मिळाली एक ट्रक,एक डंपर घेत कंत्राटदार म्हणून कामे केअली.1978 ला शिक्षकी क्षेत्र सोडले तरी त्यांनी  गव्हाण हायस्कूलचे चेअरमन म्हणून जबाबदारी घेतली .जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था त्यांनी स्थापन केली.शिक्षण क्षेत्रातले  काम हे महत्वाचे काम त्यांना वाटले.रयत शिक्षण संस्थेतून त्यांना सर्वस्व ओतून काम करण्याची प्रेरणा मिळाली.जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेद्वारे त्यांनी सुरवातीस इंग्रजी माध्यमांच्या शाळा काढल्या.गव्हाणला 1 कोटी आणि 10 लाख रुपये  खर्च करून त्यांनी  हायस्कूल बांधले.जनार्दन  भगत यांच्यामुळे प्रेरणा मिळत गेली ..आपल्या वाट्याला गरिबीतून शिक्षण घेण्याचे भोग आले तरी इतर कोणाच्याही वाट्याला असे भोग येऊ नयेत  या जाणीवेतून त्यांनी  आजवरचे आयुष्य शैक्षणिक व सामाजिक प्रगतीसाठी दिले. .छत्रपती शिवाजी कॉलेजबद्दलची आपुलकी त्यांच्यामनात सतत आहे.पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता जनरल नॉलेज ,तंत्रज्ञान आणि सामाजिक मूल्यांची  शिकवण शिक्षणात हवी असे त्यांना वाटते. बेरोजगार तरुणांना काम मिळावे यासाठी ते सतत ध्यास घेऊन काम करतात.नवीन कोर्सेस उपलब्ध करून देणे,समाजातील प्रश्न चर्चेने सोडवणे,उद्योगात गुंतवणुकीसाठी मार्गदर्शन करणे,यातून प्रगती  साधली जाईल असा त्यांना विश्वास आहे. स्वतःच्या कर्तृत्वाने  आदर्श नागरिक होणे ,सहकार्य वृत्ती बाळगणे ही त्यांची आजीविका आहे . अशा रामशेठ ठाकूर साहेब  यांची दातृत्व वृत्ती ही एक जबरदस्त प्रेरणा बनत .राहिली आहे.

कर्मवीर अण्णांच्या काळात जनतेने फार मोठी मदत रयत शिक्षण संस्थेस केली.अनेक मोठ मोठे राजे, व्यावसायिक , सामान्य जनता यांनीदेखील बहुजन शिक्षणासाठी जमिनी दिल्या.वाडे दिले.छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये ही उदात्त प्रेरणा रामशेठ ठाकूर साहेब या संवेदनशील माणसास मिळाली आणि त्यांनी आपल्या कॉलेजला ही भव्य इमारत बांधून दिली आहे .छत्रपती शिवाजी कॉलेज हे आता कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठाशी संलग्न होत असताना सुरवातीलाच उभी राहिलेली ही इमारत अनेक पिढ्या घडवेल याची खात्री आहे.मला जेंव्हा ते मराठी विषयातून पदवी पास झाले हे कळले तेंव्हा या मराठीतून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याने संस्कार आणि कृतज्ञता ठेवून हे एवढे मोठे कार्य केले हे मराठी विभागाला अभिमान वाटेल अशीच घटना आहे.आज रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरदरावजी पवार साहेब यांच्या हस्ते त्यांचा सन्मान  होताना मन भरून येत आहे. आदरणीय नामदार दिलीप वळसे पाटील यांना रयत शिक्षण संस्थेचा इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जात आहे. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम भरीव योगदान त्यांनी दिले आहे.  या समारंभास रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील, व्हाईस चेअरमन अ‍ॅड.भगीरथ शिंदे ,तसेच संस्थेचे सचिव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर ,सहसचिव प्राचार्या डॉ.प्रतिभा गायकवाड ,ऑडीटर प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे, माध्यमिक विभागाचे सचिव मा.संजय नागपुरे ,रयत शिक्षण संस्थेचे कायदेविषयक सल्लागार अ‍ॅड.दिलावर मुल्ला आणि परिवार  इत्यादी संस्थेचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहत आहेत. रयत शिक्षण संस्थेत शिकणार्‍या अनेक गरीब मुलांच्यासाठी  लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे  जीवन मार्गदर्शक  आहे. या पुढेही ते सत्कार्य करतच राहतील 71  वर्षे पूर्ण होताना  तितक्याच साधेपणाने कॉलेजला येऊन ते आपले स्वप्न पूर्ण करीत आहेत.त्यांनाही  मनापासून सदिच्छा ! लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणजे मला सामाजिक जाणीवेचा प्रेरणादायी निर्मळ झरा वाटतात ,तर ही लोकनेते रामशेठ ठाकूर भवन ही इमारत म्हणजे मला कर्मवीरांच्या सामाजिक जाणीवेची येणार्‍या पिढ्यांना मार्गदर्शन करणारी दीपस्तंभ वाटते.

-प्रोफेसर डॉ. सुभाष वाघमारे, मराठी विभाग प्रमुख, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा

मोबाईल नंबर  9890726440

Check Also

यंदाचा नमो चषक भव्य दिव्य स्वरूपात होणार -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तमागील वर्षी नमो चषक क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि त्याचप्रमाणे …

Leave a Reply