धार्मिक स्थळांवरही भाविकांची गर्दी
पाली : प्रतिनिधी
नाताळ व वीकेण्ड सुट्ट्याचा पर्यटनासाठी फायदा घेण्यासाठी पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणच्या पर्यटकांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बहरली आहेत. शुक्रवारपासूनच पर्यटक रायगडाकडे येऊ लागले. त्यामुळे महामार्गावर वाहनांची गर्दी व वाहतूक कोंडी झाली होती. जिल्ह्यातील विविध समुद्रकिनारे व पर्यटनस्थळांवर गर्दी वाढली आहे. येथील समुद्रकिनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तू, किल्ले, तीर्थक्षेत्र पाहण्यासाठी पर्यटकांचा ओघ वाढत आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिक, लॉजिंग, खानावळी, दुकानदार व छोटे मोठे व्यावसायिक यांची सध्या चलती आहे. राहण्या-खाण्याच्या दरात वाढ न झाल्याने पर्यटक मात्र खूश आहेत.
समुद्र किनार्यांची भुरळ
रायगड जिल्ह्याला तब्बल 240 किमी लांबीचा विस्तृत आणि मनमोहक समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामध्ये अलिबाग, नागाव, वरसोली, मुरूड, काशिद, श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर येथील समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालत आहेत. हे सर्व समुद्रकिनारे पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. सर्वच किनार्यांवर बोटींग, घोडागाडी, बाईक राईडची मजा पर्यटक लुटत आहेत. अलिबाग समुद्रकिनार्याची मजा लुटतांनाच पर्यटक येथे असलेल्या कुलाबा किल्ल्याला आवर्जून भेट देत आहेत.
नाताळ आणि काही दिवसांवर येऊ घातलेली वर्षाखेर यामुळे किनार्यांवर जल्लोष करण्यासाठी पर्यटक येथे तळ ठोकून आहेत. मात्र रात्रीच्या संचारबंदीमुळे पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. तरीही सर्वच ठिकाणची बुकींग फुल्ल झाली आहे. काही हॉटेल्स व कॉटेजमध्ये ऐनवेळी येणार्या पर्यटकांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच खास सुट व आकर्षक ऑफर दिल्या आहेत.
थंडीचा जोर वाढत असला तरी माथेरान पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहे. आठवड्याभरापासूनच येथील हॉटेल्स व लॉज बुक झाले असले तरी येणार्या पर्यटकांची कोणतीच गैरसोय होणार नाही याची काळजी येथील व्यावसायिक घेत आहेत.
बल्लाळेश्वर, वरदविनायकाच्या दारी भक्तांची मांदियाळी
तब्बल आठ महिन्यांपासून बंद असलेल्या मंदिरांची दारे मागील महिन्यात उघडली आहेत. अष्टविनायकांपैकी दोन गणपती रायगडमध्ये आहेत. खालापूर तालुक्यातील महडचा वरदविनायक आणि सुधागड तालुक्यातील पालीचा बल्लाळेश्वर यांच्या दर्शनासाठी सध्या भाविकांची रीघ लागली आहे. मंदिराच्या आसपास असलेली फुल, हार, नारळ, प्रसाद, पुजेचे साहित्याची दुकाने सजली आहेत. त्यांचाही व्यवसाय तेजीत आहे.
हरिहरेश्वरमध्ये पर्यटन आणि अध्यात्माचा सुरेख संगम
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्या श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वरला पर्यटकांसह भाविकांचीही पसंती असते. भव्य समुद्रकिनारा आणि देवदर्शन अशा दोन्ही गोष्टींचा सुरेख संगम तेथे साधता येतो. महाराष्ट्र पर्यटन विभागाने (एमटीडीसी) येथे पर्यटकांसाठी राहण्याची सोय केली आहे. खाजगी लॉजसुद्धा उपलब्ध आहेत. तेथूनच दिवेआगर आणि श्रीवर्धनच्या समुद्रकिनार्यावर जाता येते.
रायगडावर शिवप्रेमींची गर्दी
अनलॉकनंतर आता रायगड किल्ल्यावर शिवप्रेमी मोठया संख्येने येत आहेत. गडावर जाण्यासाठी अनेकजण रोपवेला पसंती देत आहेत. त्यामुळे तेथे गर्दी होतांना दिसत आहे.
सुट्ट्या असल्याने पर्यटकांचा ओघ खूप चांगला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना थोडे रिफ्रेश व्हायचे आहे. म्हणूनच ते कुटुंब व मित्रपरिवारासह फिरण्यासाठी निघत आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळे बहरली आहेत.
-मनीष पाटील, चालक, माऊ रिसॉर्ट, दिवेआगर
शिवप्रेमी व पर्यटक रायगड किल्ल्यावर मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. त्यामुळे येथील व्यवसाईकांचा व्यवसाय तेजीत आला आहे.
-अजित औकिरकर, माजी उपसरपंच, हिरकणीवाडी, ता. महाड