उरण : प्रतिनिधी
राज्य शासनाच्या आदेशानुसार 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला सोमवार (दि. 3)पासून सुरुवात करण्यात आली आहे. दोन दिवसांत उरणधील आठ विद्यालयामधील जवळ जवळ 1250 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, अशी माहिती उरण आरोग्य अधिकारी राजेंद्र इटकरे यांनी दिली आहे. कोरोनाने दोन वर्षे हाहाकार माजला आहे. त्यावर प्रतिबंधक उपाय म्हणून अनेक उपाययोजना करीत आहेत. यातील लसीकरण या उपाययोजनेतील मोहिमेत 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचे ठरविण्यात आले असून त्याला सुरुवातही झाली. विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी उरणची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. तुकाराम हरी वाजेकर फुंडे, रामचंद्र म्हात्रे विद्यालय आवरे, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय जासई, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोन, उरण शहरातील एनआय हस्यस्कूल अशा पाच शाळांमध्ये लसीकरण होत आहे. प्रत्येक शाळेमध्ये आरोग्य अधिकारी आरोग्य सहाय्यक, आरोग्य परीवेक्षक परिचारिका असे नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसोबत वेळेवर विद्यालयात हजेरी लावली होती. यासाठी विद्यालयांकडून उत्तम असे नियोजन लसीकरणासाठी करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी आरोग्य विभाग आणि शाळेतील प्राचार्य यांची बैठक घेऊन सर्व माहिती देण्यात आली होती.