लाहोर : वृत्तसंस्था
इंग्लंड आणि वेल्स येथे होऊ घातलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेला अवघा महिनाभराचा कालावधी शिल्लक राहिला आहे. 30 मे ते 14 जुलै या कालावधीत रंगणार्या या महासंग्रमात 10 अव्वल संघ जेतेपदासाठी भिडतील, पण भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धींच्या लढतीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत उभय संघांमधील प्रत्येक सामना हा युद्धाप्रमाणेच असतो आणि त्याचा तणाव हा मैदानापेक्षा बाहेरच अधिक जाणवतो. 16 जूनला ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणार्या सामन्यातही असेच चित्र पाहायला मिळेल, परंतु पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकनं भारत-पाक सामन्याला युद्ध म्हणून का बघता, असा सवाल केला आहे.
1947च्या फाळणीनंतर या शेजारील राष्ट्रांमध्ये नेहमीच तणाव सदृश परिस्थिती राहिलेली आहे. त्यामुळे क्रिकेट, हॉकी आदी खेळाच्या मैदानावरही तो तणाव पाहायला मिळतो. शोएब मलिकने दिलेल्या मुलाखतीत मात्र काही वेगळे मत व्यक्त केले. भारत-पाक सामन्याला ‘युद्ध’ असे संबोधणे शोएबला पसंत नाही. तो म्हणाला, ‘भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये होणार्या सामन्याला युद्ध असे का संबोधले जाते, हे मला कळलेले नाही. हा अत्यंत चुकीचा शब्द आहे. त्यापेक्षा ‘प्रेम’ हा शब्द वापरा. मग सर्वकाही सुरळीत होईल.’
तो पुढे म्हणाला की, ‘क्रिकेट असो किंवा कोणताही खेळ त्यानं दोन देशांतील लोकं एकत्र येतात. त्यामुळे भारत-पाक सामन्याकडे युद्ध म्हणून पाहू नका. भारताविरुद्धचा सामना हा आमच्यासाठी अन्य सामन्यांप्रमाणेच आहे.’ 2019ची ही वर्ल्ड कप स्पर्धा अखेरची असल्याचे शोएबने आधीच जाहीर केले आहे. शोएबने पाकिस्तानकडून 282 वन डे सामन्यांत 7481 धावा केल्या आहेत. त्यात 9 शतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्याने 111 सामन्यांत 2263 धावा केल्या. शोएबच्या नावावर 216 आंतरराष्ट्रीय विकेट्सही आहेत.