जयपूर : वृत्तसंस्था
आयपीएलच्या बाराव्या हंगामातील घरच्या मैदानावर शेवटचा सामना खेळणार्या राजस्थानने शेवट गोड करीत हैदराबादवर सात गडी राखून विजय मिळवला. मनीष पांडेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर हैदराबादने राजस्थानला 161 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान राजस्थानने 5 चेंडू राखून सहज पूर्ण केले.
161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अजिंक्य रहाणे आणि नवोदित लिआम लिव्हिंगस्टोन या सलामीवीरांनी राजस्थानला दमदार सुरुवात करून दिली. त्यांनी सहाव्या षटकात अर्धशतक धावफलकावर लावले. लिव्हिंगस्टोन चांगली फलंदाजी करीत असताना रशीद खानने त्याचा अडसर दूर केला. लिव्हिंगस्टोनने 26 चेंडूंत 44 धावा ठोकल्या. चांगली सुरुवात मिळाल्यानंतर अजिंक्य रहाणेहीबाद झाला. त्याने 39 धावांची उपयुक्त खेळी केली. राजस्थानचा कर्णधार मोठा फटका खेळताना बाद झाला. त्याने 22 धावा केल्या.
त्याआधी, राजस्थानच्या गोलंदाजांनी मधल्या फळीत केलेल्या दमदार पुनरागमनाच्या जोरावर राजस्थानने घरच्या मैदानावर हैदराबादला 160 धावांवर रोखण्यात यश मिळविले. हैदराबादचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि केन विल्यमसन यांनी संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. जॉनी बेअरस्टो हा हैदराबादचा विश्वासू सलामीवीर विश्वचषकाच्या तयारीसाठी मायदेशी परतला. त्यामुळे विल्यमसनला सलामीला यावे लागले. वॉर्नर -विल्यमसन यांनी पहिल्या विकेटसाठी 28 धावांची छोटेखानी भागीदारी केली, मात्र विल्यमसन मैदानावर फार काळ तग धरू शकला नाही.
विल्यमसन बाद झाल्यानंतर मनीष पांडे आणि वॉर्नर यांनी आश्वासक भागीदारी करून संघाचा डाव सावरला. या दोघांनी संघाला शतक गाठून दिले. संघाची धावसंख्या 1 बाद 103 असताना वॉर्नरचा स्टीव्ह स्मिथने अप्रतिम झेल टिपला. त्यानंतर हैदराबादला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. वॉर्नर माघारी परतल्यानंतर हैदराबादचे फलंदाज राजस्थानच्या गोलंदाजीचा सामना करू शकले नाहीत. हैदराबादचे मनीष पांडे, विजय शंकर, शाकीब अल हसन, दीपक हुडा, वृद्धीमान साहा आणि भुवनेश्वर कुमार हे सात गडी एका पाठोपाठ एक असे तंबूत परतले. विल्यमसन, पांडे, वॉर्नर आणि खान वगळता कोणालाही दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही.
अखेर तळातल्या फळीतल्या फलंदाजांनी हैदराबादला 160 धावांचे लक्ष्य गाठून दिले. राजस्थानकडून थॉमस, वरुण अरॉन, श्रेयस गोपाळ आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी दोन गडीबाद केले.
- चेन्नई ‘प्ले ऑफ’मध्ये
राजस्थानने हैदराबादवर मिळविलेला विजय हा चेन्नईच्या पथ्यावर पडला आहे. मुंबईविरुद्ध चेन्नईच्या संघाला पराभव पत्करावा लागला होता. तो सामना चेन्नईने जिंकला असता, तर ‘प्ले-ऑफ्स’मध्ये त्यांना थेट प्रवेश मिळाला असता, पण त्यांचा प्रवेश लांबणीवर पडला होता. अखेर राजस्थानच्या संघाने मिळवलेल्या विजयामुळे अखेर चेन्नई पुढील फेरीसाठी पात्र ठरली आहे.