महाराष्ट्रातील दानशूर व समाजभान असलेल्या आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयात काही महिन्यांपूर्वीच एन. डी. पाटील सरांचे शेवटचे व्याख्यान ऐकले. प्रसंग होता आदरणीय पाटील साहेबांना स्वर्गीय जनार्दन भगत स्मृती पुरस्कार प्रदानाचा. त्यांना भाषणासाठी उभे राहता येत नव्हते. तरीही हजारोंच्या समुदायाला त्यांनी अर्धा तास खिळवून ठेवले. ही त्यांची बुलंद आवाजाची, प्रत्येक श्रोत्याला आपलेसे करण्याची खासियत शेवटपर्यंत स्मरणात राहील.
एन. डी. सरांना मी प्रथम पाहिले, ते पंढरपूर येथील भाई मुरलीधर थोरात यांच्याकडे. शालेय जीवनापासूनच एन. डी सरांच्या समोर बसून वेगवेगळ्या प्रासंगिक कथा ऐकण्याचे भाग्य आम्हाला लाभले. पंढरपूरच्या शिवाजी चौकातील सत्यशोधक समाजाच्या सभेतील भाषण स्मरणात राहिले. सर रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन झाल्यानंतर दक्षिण कोकणात राजापूर जवळील हातिवले गावालगत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची पायाभरणी झाली. सरांनी हे कॉलेज दत्तक घेतले होते. सुरुवातीच्या काळात वर्गखोल्या हव्या होत्या. ती अडचण राजापूरमधील प्रतिष्ठीतांनी, नगराध्यक्षांनी दूर केली व नवजीवन विद्यालयाची नवीन वास्तु तात्पुरत्या स्वरूपात दिल्याने राजापूरमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या वटवृक्षाची एक पारंबी रुजली गेली. आज त्या ठिकाणी दानशूर रमेश मराठे यांच्या वडिलांच्या नावाने आबासाहेब मराठे महाविद्यालयाची वास्तू 35 एकर जागेत डौलदारपणे उभी आहे.
प्राध्यापक एन. डी. पाटील यांच्या मते, महाविद्यालय हे केवळ चार भिंतीचा वर्ग आणि चार तासांचे शिकवणे असे नसावे तर ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे समाज प्रबोधनाचे, समाजाच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र असावे. दक्षिण कोकणात चिरा दगड मोठ्या प्रमाणात काढला जातो. चिराखाण कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची कोणतीच सुविधा नसते. ही बाब सरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत मला माहिती घ्यायला सांगितले. त्याप्रमाणे मी सर्व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने सर्वेक्षण केले. त्याआधारे सरांनी आम्हाला चिराखाण कामगारांच्या मुलांची शाळा चालू करण्यास सुचवले. त्याप्रमाणे मी, प्रा. काळभोर, प्रा. कानडे यांनी ही शाळा चालवली. याची दखल महाराष्ट्रातील विविध प्रसारमाध्यमांनी घेतली. याबरोबरच हे महविद्यालय अंधश्रद्धा निर्मूलनाचे केंद्र बनले.
सरांनी नेते कमी परंतु कार्यकर्ते खूप घडवले. कार्यकर्त्यांच्या सुखदुःखातही नेहमी त्यांचा सहभाग असे. अशाच एका प्रसंगी गुहागरमधील पालशेत या ठिकाणी त्यांच्या बरोबर जाण्याचा मला योग आला. प्रसंग होता तेथील माजी आमदारांच्या आजारपणाचा. त्यांनी खूप मायेने व आस्थेने माणसे जमवली.
रायगड जिल्ह्यावर सरांचे विशेष प्रेम होते. स्व. दि. बा. पाटील साहेब, दत्तूशेठ पाटील साहेब, आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब, अॅड. दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, जे. एम. म्हात्रे व इतर अनेक मान्यवर आणि त्यांची वैचारिक देवाण-घेवाण होतीच. शिवाय स्नेहाचे संबंध होते. या भागातील रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांवर त्यांचे विशेष लक्ष असे.
मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या या भागातील सेझ प्रकल्पाविरुद्ध निर्माण झालेल्या चळवळीतील एक युद्धा म्हणून सरांचा उल्लेख होतो. रायगड जिल्ह्यातून सेझ प्रकल्प हद्दपार व्हावा, याकरिता झालेल्या एन. डी. सरांच्या काही सभांचा मी साक्षीदार आहे.
विद्यार्थीदशेमध्ये स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झालेल्या एन. डी. नीं त्या वेळी कारावास भोगला होता. गोवा मुक्ती लढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, साराबंदी चळवळ, शेतकरी दिंडी, दुष्काळ निवारण मोर्चा, शेतकरी आंदोलने, सेझविरोधी आंदोलन, टोलविरोधी आंदोलन, वीजदरवाढ विरोधी आंदोलन, कापूस दर आंदोलन यासारखी शेकडो आंदोलने गेल्या काही दशकात एन. डी. सरांनी लढली व यशस्वी केली. काहींच्या पूर्ततेसाठी ते अखेरपर्यंत लढत राहिले. पायाचे ऑपरेशन होऊन हातात आधारासाठी काठी घ्यावी लागेपर्यंत एन. डी. सर्वत्र एसटीनेच प्रवास करत होते. अलीकडे व्हीलचेअरवर बसूनही ते आंदोलनाच्या अग्रभागी असायचेच.
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे एन. डी.सरांच्याबाबत तंतोतंत खरे आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचे सहकार मंत्री असतानाही स्वतःचे कपडे स्वतः धुताना एन. डी. दिसले. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता म्हणून आलेले मानधन आपल्याबरोबर वाटचाल करणार्या गोरगरीब कार्यकर्त्यात वाटून त्यांना सुखाचे दोन दिवस देऊ पाहणारे एन. डी. दिसतात. तसेच आपल्याला मिळालेल्या लाखो रुपयांच्या पुरस्काराच्या रकमा त्याच व्यासपीठावरून सामाजिक, शैक्षणिक काम करणार्या संस्थांना, चळवळींना ते देताना दिसतात.
एन. डी. पाटील सर जरी काळाच्या पडद्याआड गेले असले तरी समाज परिवर्तन, शिक्षण व संघटनमधील कार्यकर्त्यांकरिता खूप काही आठवणी मागे आहेत. थोर विचारवंत, वंचितांच्या शिक्षणाची तळमळ असलेले, लढाऊ व्यक्तिमत्व व रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन प्रा. डॉ. एन डी पाटील साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली!
-प्रा. डॉ. संदीप विलासराव घोडके, नवी मुंबई. (9869185747)