पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील जनता मागील कित्येक वर्षापासून वीजसमस्येने हैराण झाली आहे. अनियमित वीजपुरवठा आणि वाढीव बिले यामुळे येथील जनतेत असंतोष खदखदत होता. वारंवार खंडित होणारी वीज व तालुक्यातील पथदिवे चालू करण्यात आले नाहीत, याकडे लक्ष वेधण्यासाठी सुधागड मनसेतर्फे गुरुवारी (दि. 2) पाली महावितरण कार्यालयात घंटानाद आंदोलन करण्यात आले. या वेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सुधागड तालुक्यातील जनतेला विजेचा प्रश्न कायम भेडसावत आहे. वीजपुरवठा वारंवार खंडित होतोय. वीज बिले मात्र वेळच्या वेळी येतात, कधी ही बिले वाढीव स्वरूपाची असतात. वीजपुरवठा सुरळीत होणे गरजेचे आहे, शासनाला अनेकदा निवेदने देऊन काही सुधारणा होत नसेल, तर यापुढील जनआंदोलन अधिक व्यापक स्वरूपाचे असेल, असा इशारा सुधागड मनसे अध्यक्ष सुनील साठे यांनी या वेळी दिला. मनसेचे पाली शहर अध्यक्ष अंकुश चोरघे, विभाग अध्यक्ष केवल चव्हाण, परेश वनगले, अजिंक्य पाशीलकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.