Breaking News

आणखी किती बळी?

इमारतीची अग्निशमन यंत्रणा कुचकामी असणे, फायर ऑडिट केलेले नसणे, अरुंद रस्त्यांमुळे इमारतीजवळ जाणे अग्निशमन दलाच्या गाड्यांना शक्य न होणे ही परिस्थिती मुंबईत नित्याची झाली आहे. या सार्‍या दुरावस्थेवर कोणतीही प्रभावी उपाययोजना न करता शहरात बहुमजली इमारतींच्या संख्येत प्रतिवर्षी मोठी भर पडते आहे. चाळींचा पुनर्विकास हा विशिष्ट वर्गाचे उखळ पांढरे करतो आहे खरे, पण तिथे राहण्याचे स्वप्न पाहणार्‍यांच्या सुरक्षेची पुरती काळजी घेतली जाईलच याची खातरजमा कोण करणार? नागरिकांकडून कररूपाने महसूल जमा करणार्‍या मुंबई महापालिकेने याकडे लक्ष द्यायला नको का?

आगीची आणखी एक दुर्घटना शनिवारी मुंबईत नोंदली गेली. बहुमजली निवासी इमारतीतील या आगीत सहा जणांचा बळी गेला तर 17 जणांना जखमी अवस्थेत रुग्णालयांत दाखल करण्यात आले. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी दक्षिण मुंबईत अन्य एका बहुमजली इमारतीच्या 19व्या मजल्यावरच आग लागली होती. अग्निशमन दलाकडील माहितीनुसार गेल्या दहा वर्षांत मुंबईतील उंच इमारतींमध्ये आगीच्या दीड हजारांहून अधिक घटना नोंदल्या गेल्या आहेत. आगीच्या ताज्या घटनेतील मृतांची संख्या दुसर्‍या दिवशी वाढून सातवर गेली. येत्या आठवड्यात हा आकडा कदाचित आणखी वाढेलही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्हींकडून मृतांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली आहे. आगीचे कारण नेहमीप्रमाणेच बहुदा शॉर्ट सर्किट असावे असे सांगण्यात आले आहे. तसेच सात वर्षांपूर्वी चाळीचा पुनर्विकास करून बांधलेल्या सचिनम हाइट्स नामक या बहुमजली इमारतीतील अग्निशमन यंत्रणाही दुर्दैवाने पूर्णत: ठप्प होती. आता नेहमीच्या शिरस्त्याने त्याची चौकशी होईल. आग बहुदा तळमजल्यावर लागली होती आणि इमारतीच्या डक्टमधून ती संपूर्ण इमारतभर पसरली असे सांगितले गेले. यामुळेच प्रत्येक मजल्यावर घरांबाहेरील मोकळ्या जागेत धुराचे साम्राज्य पसरले होते. झोपेतून जागे होत कशीबशी बाहेर धाव घेणार्‍या सर्व फ्लॅटधारकांना श्वास कोंडणार्‍या धुराचा सामना करावा लागला. परिणामी घटनेतील एकूण जखमींची संख्या 23 इतकी मोठी दिसते. मृतांपैकीही तिघांचा मृत्यू भाजल्याने तर तिघांचा श्वास कोंडल्याने झाला आहे. दुर्घटना नेमकी कशी घडली याचे तपशील कदाचित येत्या काही दिवसांत समोर येतील किंवा आगीचे नेमके कारण समजू शकले नाही असाही घटनेचा समारोप होईल. चाळीचा पुनर्विकास करून बांधलेली ही इमारत होती हे इथे विशेषत्वाने लक्षात घेतले पाहिजे. वर्षातून दोनदा अग्निशमन दलाकडे सुपुर्द करण्याचे फायर ऑडिट या इमारतीने केलेलेच नव्हते. आता याकरिता कोणाला जबाबदार धरायचे? ही जबाबदारी जशी या इमारतीतील फ्लॅटधारकांची तशीच ती अग्निशमन दलाची आणि महापालिकेची नव्हे का? मुंबईत अफाट वेगाने पुनर्विकास सुरू आहे. दक्षिण मुंबईतून सहज फेरफटका मारला तर आडवे पसरणे शक्य नसल्याने उभ्या वाढीचा पर्याय निवडलेल्या या शहराचे कसे होणार असा प्रश्न मनात डोकावतो. गेल्या दशकभरात मुंबईतील बहुमजली इमारतींच्या आगीपासून सुरक्षेचा प्रश्न पुन्हा पुन्हा चव्हाट्यावर येतो आहे. जेव्हा जेव्हा या महानगरीत अशा दुर्घटना घडतात, तेव्हा तेव्हा नेहमीचेच चित्र समोर येते. इमारतींच्या वाढत्या संख्येबरोबरच त्यांची उंचीही आकाशाला गवसणी घालते आहे. इमारतींनी वा सोसायट्यांनी सुरक्षाविषयक नियमांचे उल्लंघन केले असे म्हणत मुंबई महापालिका आपली जबाबदारी किती वर्षे झटकत राहणार आहे?

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply