Breaking News

श्याम बेनेगल; आशय अन् पोस्टर्सचे वैशिष्ट्य जपणारे दिग्दर्शक

अंकूर असो की निशांत वा मंडी… चित्रपटाचे नाव घेताच त्या चित्रपटाचे दिग्दर्शक श्याम बेनेगल आहेत यापासून त्या चित्रपटाचे एकूणच व्यक्तिमत्व, त्याचा आशय, त्याचा प्रभाव असे सगळेच आपल्या डोळ्यासमोर येते हे वैशिष्ट्यपूर्ण. चित्रपट माध्यम व व्यवसायातील हीदेखील एक उल्लेखनीय गोष्ट. श्याम बेनेगल (जन्म 14 डिसेंबर 1934. मृत्यू 23 डिसेंबर 2024) यांच्या चौफेर वाटचालीवर फोकस टाकावा तेवढा थोडाच. भारतीय चित्रपटसृष्टीची दिशा बदलणारा दिग्दर्शक यापासून ते समांतर चित्रपट प्रवाहातील खंदा उद्गाता यापर्यंत बरेच काही सांगता येईल. 14 डिसेंबर रोजी आपल्या वयाचा नव्वदावा वाढदिवस ताडदेव येथील आपल्या स्टाफसोबत साजरा करणारे श्याम बेनेगल आणखी काही दिवसांतच म्हणजे 23 डिसेंबर 2024 रोजी आपला जीवन प्रवास थांबवतात हे स्वीकारणे तसे बरेच जडच, पण सतत कार्यमग्न असणारा असा एक न थांबणारा दिग्दर्शक ही त्यांची ओळख कायम राहिल. विशेषत: चित्रपट माध्यम व व्यवसाय याचा गंभीरपणे विचार करणारा असा चित्रपटसृष्टी, प्रसारमाध्यम आणि चित्रपट रसिक यातील वर्ग हे कायमच श्याम बेनेगल यांच्या कसदार कलात्मक कलाकृतींशी जोडलेले राहतील.
श्याम बेनेगल यांच्या अगणित वैशिष्ट्यांतील एक म्हणजे त्यांच्या दिग्दर्शनातील विषयानुसारची त्यांच्या चित्रपटांची पोस्टर. त्यांनी 1959 साली आपल्या कारकीर्दीची सुरुवात लिंटास अ‍ॅडव्हर्टायझिंग या जाहिरात एजन्सीत केली, त्यातून ते जाहिरातपटाकडे वळले आणि मग सतत नवीन गोष्टी शिकत व घडवत घडवत चित्रपट माध्यमापर्यंत आले. भारतातील ग्रामीण भागातील जीवनावर आधारित चित्रपट हे त्यांचे विशेष उल्लेखनीय वैशिष्ट्य. ते करताना त्यांनी आपल्या चित्रपटांच्या पोस्टरवरही विशेष लक्ष दिल्याचे दिसून येते. सत्तरच्या दशकात रस्त्यावरील चित्रपटांची पोस्टर व होर्डिंग्ज ही जनसामान्यांपर्यंत चित्रपट पोहचवण्याची अतिशय प्रभावी व महत्त्वाची माध्यमे होती. पारंपरिक लोकप्रिय मसालेदार मनोरंजक चित्रपटांची अतिशय हाऊसफुल्ल गर्दीत वाटचाल सुरू होती. बस स्टॉपपासून रेल्वे स्टेशनपर्यंत सगळीकडे पोस्टर्सची गर्दी होती. त्यात आपल्या चित्रपटाची वेगळी ओळख निर्माण झाली तरच प्रेक्षक चित्रपटगृहात येत. याचं भान अथवा व्हीजन खुद्द दिग्दर्शकांनाही असणे आवश्यक आहे. चित्रपट फक्त चित्रपटगृहावर लागतो, पडद्यावर घडतो/दिसतो/असतो असे नाही तर तो पोस्टरपासूनच दिसायला लागतो. अशी सर्वव्यापक दृष्टिकोन असणार्‍या दिग्दर्शकांत चित्रपती व्ही.शांताराम (दो आँखे बारह हाथ, झनक झनक पायल बाजे, गीत गाया पत्थरोंने, नवरंग, पिंजरा इत्यादी), राज कपूर (बरसात, आग, आवारा, संगम, मेरा नाम जोकर, बॉबी इत्यादी), मेहबूब खान (अंदाज, मदर इंडिया, आन इत्यादी), के. असिफ (मुगल-ए-आझम), गुरुदत्त (प्यासा, कागज के फूल इत्यादी), राज खोसला (वह कौन थी, मेरा साया, मेरा गांव मेरा देश, दो रास्ते, प्रेम कहानी इत्यादी), विजय आनंद (नौ दो ग्यारह, तेरे घर के सामने, गाईड, ज्वेल थीफ, जॉनी मेरा नाम, तेरे मेरे सपने इत्यादी), बासू भट्टाचार्य (अनुभव, गृहप्रवेश, आविष्कार, आस्था इत्यादी), गुलजार (अचानक, मौसम, आंधी, किताब, किनारा इत्यादी), गोविंद निहलानी (अर्धसत्य, द्रोहकाल, देव इत्यादी), रवींद्र धर्मराज (चक्र) अशा दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटाच्या पोस्टर डिझाईनचे वैशिष्ट्य कायमच जपले. श्याम बेनेगल यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटांबाबतही हेच दिसते. (हा एकूणच हा विषय काहीसा दुर्लक्षित का बरे राहिला असेल?)
सत्तरच्या दशकात दाग, जंजीर, आप की कसम, प्रेम नगर, दीवार, प्रतिज्ञा, रोटी कपडा और मकान, शोले, जानेमन, अमर अकबर अ‍ॅन्थनी, त्रिशूल, धरमवीर, आझाद, दुल्हन वही जो पिया मन भाये, छैला बाबू, मुकद्दर का सिकंदर, लावारीस, रेड रोझ, ज्योती बने ज्वाला अशा मसाला मिक्स मनोरंजन चित्रपटांच्या पोस्टर गर्दीत आपल्या दिग्दर्शनातील चित्रपट हरवून जाऊ नये याची पहिली खेळी त्याचे पोस्टर हेच आहे याची जाणीव श्याम बेनेगल यांना असल्याचे कायमच ’दिसून’ आले आहे आणि या चित्रपटांच्या प्रेक्षकांतून आपल्या चित्रपटांकडे प्रेक्षक वळवणे हेही आवश्यक होतेच. आपल्या देशात समांतर चित्रपट अथवा नवप्रवाहातील चित्रपट रुजण्याचे अधिकाधिक श्रेय श्याम बेनेगल यांजकडे जाते, पण त्यासाठी त्यांनी बहुस्तरीय काम केले हेदेखील सांगायला हवे. त्यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटांची पोस्टर बोलत/सांगत हे आवर्जून दिसतेय. अंकुर (1973), निशांत (1975), मंथन (1976), भूमिका (1977) जुनून (1978), कलयुग (1981), मंडी (1983), त्रिकाल (1985), यात्रा (1986), सुस्मन (1987), मम्मो (1994), सरदारी बेगम (1996), समर ( 999), झुबैदा (2001), सूरज का सांतवा घोडा (1992), बॉस द फॉरगॉटन नेताजी बोस (2005), वेलकम टू सज्जनपूर (2008), वेल डन अब्बा (2010), मुजीब द मेकिंग ऑफ नेशन अशी त्यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटांची नावेच त्यांच्या चित्रपटांची पोस्टर व आशय पटकन डोळ्यासमोर आणतात. या त्यांच्या अतिशय वेगळेपणाची दखल घ्यायलाच हवी. समांतर चित्रपटाचा प्रवाह रूजवण्यात अनेक अडथळे होतेच. सर्वप्रथम प्रश्न होता तो आर्थिक पाठबळाचा, अशा चित्रपटांना वितरक मिळण्याचा (यातील काही चित्रपट राष्ट्रीय चित्रपट निर्मिती महामंडळ अर्थात एनएफडीसीच्या अर्थसहाय्याने निर्माण झाले. वेगळ्या प्रवाहातील चित्रपट निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी हे होते), चित्रपटगृह प्राप्त होणे आणि अशा समांतर चित्रपटासाठी प्रेक्षक संस्कृती वाढवणे, त्यानुसार काही चर्चासत्र आयोजित करणे अशी एक प्रकारची चळवळ निर्माण केली गेली.
पन्नास वर्षांत भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासह जगभरातील कान्स, बर्लिन, मॉस्को, मेलबर्न अशा अनेक देशातील चित्रपट महोत्सवात श्याम बेनेगल दिग्दर्शित चित्रपटांचा समावेश होत आहेच. त्यात त्यांच्या चित्रपटांच्या पोस्टर्सनी जगभरातील चित्रपट दिग्दर्शक, कलाकार, अभ्यासक, विश्लेषक, पत्रकार यांचे लक्ष वेधून घेतले.
अगदी फिल्म मार्केटमध्ये या पोस्टरचे स्थान व महत्त्व उल्लेखनीय ठरले. आताही त्यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटांच्या विशेष महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल तेव्हा त्यांच्या या चित्रपटांच्या बोलक्या व प्रभावी अशा पोस्टर संस्कृतीवर विशेष फोकस (एखादा परिसंवाद) एक वेगळेपण ठरेल. त्यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटांचे पोस्टर प्रदर्शनदेखील लक्षवेधक ठरेल, आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीसमोर वेगळा आदर्श राहिल, बरेच काही शिकता येईल आणि त्यांना एक वेगळीच श्रद्धांजलीही ठरेल. पोस्टर डिझाईन हीदेखील त्यांची विशेष खासियत होती हे या सगळ्यातून एस्टॅब्लिज होईल.

-दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply