पोलादपूर : प्रतिनिधी
पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटामध्ये रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका टँकरने अचानक पेट घेतला. या वेळी कशेडी टॅप आणि पोलादपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रथम पाणीवाहू टँकरने आग आटोक्यात आणली, मात्र तरीही टँकर धुमसत असल्याने महाड नगर परिषद आणि खेड नगर परिषदेच्या दोन अग्निशमन बंबांनी आग पूर्णपणे विझवण्याचे काम चोख बजावले. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एक ज्वालाग्रही रसायनवाहू टँकर महाडकडून खेडच्या दिशेने निघाला असताना अचानक टँकरच्या ड्रायव्हर केबिन आणि पुढच्या टायर्समधून धुराचे लोट येऊन टँकरने पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच पोलादपूरचे पोलीस उपनिरीक्षक भोईर, पोलीस नाईक इकबाल शेख, वाहतूक पोलीस विश्राम गुंजाळ, राज पवार, वसंत जाधव आदींनी तसेच कशेडी टॅपचे तोडकर, तडवी, मोहिते, दूरगावडे, पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली. यादरम्यान याच ठिकाणाहून पाणीवाहू टँकर जाताना पाहून या टँकरमधील पाण्याचा मारा करून पेटत्या टँकरची आग आटोक्यात आणली. टँकरला आग लागल्यानंतर कशेडी घाटातील वाहतूक काहीशी मंदगतीने सुरू राहिल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. यामुळे खेड व महाड नगर परिषदेचे अग्निशमन बंब घटनास्थळी पोहचण्यास विलंब झाला. महाड नगर परिषदेचा अग्निशमन बंब पोहचताच तातडीने धुमसणार्या टँकरवर पाण्याचा जोरदार मारा करून आग पूर्णत: विझवण्यात यश आले. या वेळी खेड नगर परिषदेचा अग्निशमन बंब पोहचला आणि त्याद्वारे घाट रस्त्यावर पडलेले निसरडे तेल व वंगणयुक्त पाणी धुवून रस्ता निर्धोक करण्यात आला.