लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती
उरण ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उरण द्रोणागिरी नोड येथील श्रीमती भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाळेने केलेल्या कामगिरीबद्दल आणि मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा अभियानात मिळवलेल्या यशाबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कौतुक केले तसेच भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
वार्षिक स्नेहसंमेलनाला प्रमुख मान्यवर म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल नेहूल, वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र मिसाळ, दिलीप चव्हाण, विद्यालयाचे चेअरमन चंद्रकांत घरत, शाळा कमिटी मेंबर शेखर तांडेल, सुनील पाटील, सुरेश पाटील, स्नेहल पाटील यांच्यासह पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यालयाने 2023-24मध्ये मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या अभियानात तालुकास्तरीय द्वितीय, तर 2024-25मध्ये प्रथम क्रमांक मिळवला याचा उल्लेख मुख्याध्यापिका अनुराधा काठे यांनी प्रास्ताविकात केला. या स्नेहसंमेलनात गुणवंत विद्यार्थी तसेच शाळेचे शिक्षक व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.