Breaking News

अखेरचा हा तुला दंडवत…!

जीवनचक्र अविरतपणे सुरू असते. एकाने विराम घेतला तर त्या व्यक्तीची जागा दुसरे कुणीतरी घेत असते, पण काही व्यक्तिमत्त्व अशी असतात की, जी ध्रुव तार्‍याप्रमाणे अढळ असतात. अशा दुर्मीळ असामींपैकी संगीत क्षेत्रातील एकमेवाद्वितीय गानसम्राज्ञी म्हणजे लता मंगेशकर. त्यांच्या निधनाने दैवी सूर हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

गोव्याचे मंगेशकर घराणे संगीतकलेचे निस्सीम उपासक. लतादीदींचे वडील मास्टर दिनानाथ मंगेशकर शास्त्रीय गायक आणि नाट्यकलावंत होते. स्वाभाविकपणे लतादीदींना गायनाचा वारसा वडिलांकडून मिळाला. लहानपणापासूनच त्यांनी गायन शिकता शिकता संगीत नाटकांमध्ये बालकलाकार म्हणून कामही केले. भविष्यकाळ उज्ज्वल दिसत असताना लतादीदींच्या आयुष्यात एक मोठा आघात झाला, तो म्हणजे त्या अवघ्या 13 वर्षांच्या असताना वडिलांचे हृदयविकाराने अकाली निधन झाले. लतादीदी पाच भावंडांमध्ये सर्वांत मोठ्या होत्या. परिणामी कुटुंबाचा सारा भार त्यांच्यावर पडला, परंतु अशा कठीण परिस्थितीत न खचता त्यांनी संगीत शिक्षण सुरू ठेवले व याच कलेतून परिवाराचा उदरनिर्वाह अशी दुहेरी जबाबदारी पेलली. यासाठी त्यांना वडिलांचे मित्र व नवयुग चित्रपट कंपनीचे मालक मास्टर विनायक

यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपल्या देशात संगीत क्षेत्रामध्ये अनेक नामांकित कलावंत कार्यरत होते. अशा प्रस्थापित कलाकारांमधून नावारूपाला येणे म्हणजे अग्नीदिव्यच होते, परंतु अतिशय मेहनत घेऊन लतादीदींनी एक एक पाऊल पुढे टाकत चित्रपटातील कथेप्रमाणे यशोशिखर गाठले आणि गायनात त्या सदाबहार नायिका बनल्या. त्यांनी उस्ताद अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले), अमानत खाँ (देवासवाले) यांच्याकडे शास्त्रोक्त शिक्षण घेतले. उस्ताद बडे गुलाम अली खानसाहेबांचे शिष्य पं. तुलसीदास शर्मा तसेच संगीतकार गुलाम हैदर यांच्याकडूनही दीदींना मार्गदर्शन लाभले. एवढी संगीत साधना करूनही चित्रपटसृष्टीत विशेषत: बॉलीवूडमध्ये गायनाची संधी मिळणे सोपे नव्हते, पण म्हणून दीदींनी हार मानली नाही. हिंदी गाण्यात शब्दोच्चार नेमके यावेत यासाठी त्यांनी शफी नावाच्या मौलवींकडून उर्दू उच्चारांचे धडे घेतले व स्वत:ला परिपूर्ण केले. यातून लतादीदींमध्ये दडलेल्या अस्सल कलाकाराची ओळख पटते.

लता मंगेशकर यांनी आपल्या जादुई आवाजाने तब्बल सात दशकांहून अधिक काळ श्रोत्यांना तृप्त केले तसेच आनंदघन नावाने संगीतही दिले. त्यांच्या गायनाचे वैशिष्ट्य म्हणजे गाण्याशी त्या समरस होत असत. याकरिता कोणतेही गाणे गाण्याआधी त्यातील शब्दांचा अर्थ त्या समजून घेत. मग त्यांच्या कंठातून बाहेर आलेल्या गीताने ऐकणार्‍याच्या काळजाचा ठाव घेतला नाही तरच नवल. मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषांमध्येही त्यांनी एकूण मिळून सुमारे 30 हजारांहून अधिक गाणी गायली. हा एक विक्रम आहे.

अशा या सरस्वतीचा आशीर्वाद लाभलेल्या भारताच्या गानकोकिळेला त्यांनी संगीत-कला क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. एवढेच नव्हे तर देशाचा सर्वोच्च

पुरस्कार भारतरत्नने त्यांचा उचित गौरव झाला. लतादीदी यापुढे आपल्यात शरीररूपी नसल्या तरी गीत रूपाने सदैव स्मृतींमध्ये असतील. या महान गायिकेला भावपूर्ण श्रद्धांजली!

-समाधान पाटील, अधोरेखित

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply