नवी मुंबईत आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू; नऊ रुग्णांवर उपचार सुरू
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या दुसर्या लाटेची तीव्रता काहीशी ओसरत असतानाच मागील काही दिवसांपासून म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून येत आहेत. सद्यस्थितीत शहरात म्युकरच्या नऊ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. पालिका क्षेत्रात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे 86 रुग्ण आढळले असून त्यातील 49 जणांनी यावर मात केली आहे, मात्र म्युकरच्या मृत्यूंचा आकडाही मोठा असल्याने आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला आहे.
म्युकरमायकोसिसच्या संकटावर मात करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. म्युकरचा प्रभाव रोखण्यासाठी रुग्णशोध, तपासणी आणि उपचार अशा प्रकारची यंत्रणा सज्ज आहे. पालिकेने म्युकरमायकोसिस संबंधित कृती आराखडा तयार केला असून त्यानुसार, अंमलबजावणी केली जात आहे. या कार्यवाहीच्या समन्वयासाठी या क्षेत्रातील अनुभवी नोडल अधिकार्याची नेमणूकदेखील करण्यात आली असून महानगरपालिकेच्या वाशी, नेरूळ व ऐरोली येथील तिन्ही सार्वजनिक रुग्णालयांत म्युकरची तपासणी करण्यासाठी बाह्यरुग्ण सुविधा कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत, तर महानगरपालिकेच्या वाशी सार्वजनिक रुग्णालयात म्युकरवरील रुग्णांवर उपचाराची सुविधा देण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया गुंतागुतीची असल्याने शहरातील नामांकीत सर्जनचे एक पॅनल बनविण्यात आले आहे.
म्युकर मायकोसिसची लक्षणे दिसू लागल्यानंतर रुग्णाने लवकर तपासणी न केल्यास आणि उपचारास विलंब झाल्यास गंभीर आजार होऊ शकतो. त्यामुळे रुग्णांनी लवकर उपचार सुरू करणे महत्त्वाचे आहे. कोरोनावरील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या व ज्यांना डायबेटिज आहे, अशा व्यक्तींवर विशेष लक्ष देण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या कॉल सेंटरद्वारे संपर्क साधण्यात येत आहेत.